शिवसेनेला यासाठी हवेत खडसे 

शिवसेनेला यासाठी हवेत खडसे 

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे पक्ष सोडणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. जळगाव जिल्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला फारसे वाढू दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्याशी सामना करून पक्ष वाढविण्यासाठी शिवसेनेला एकनाथराव खडसे हवे असल्याचे सांगण्यात येत असले तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसही त्यांच्या प्रवेशाला इच्छुक असून, त्यांचे समर्थकही राष्ट्रवादीलाच अनुकूल असल्यामुळे खडसे यांच्या प्रवेशाबाबत घोळ सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 

बंडखोरांमुळे महाजनांवर राग 
शिवसेना त्यांना घेण्याबाबत अधिक अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने चार जागा लढविल्या होत्या. चारही जागांवर पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेचे हे यश शंभर टक्के असले तरी निवडणुकीच्या काळात मात्र पक्षाच्या उमेदवारांची मोठी कसोटी ठरली होती. पारोळा येथील एकमेव जागा वगळतात पाचोरा, जळगाव ग्रामीण व चोपडा मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार उभे होते. त्यांच्या सामना करण्याचे पक्षाच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान होते. मात्र उमेदवारांनी त्यात यश मिळविले ही बाब मोठी आहे. मात्र युती असतानाही भाजपने हे उमेदवार उभे केले होते. विशेषत: पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्या पाठिंब्यामुळेच हे उमेदवार उभे करण्यात आले असल्याचा आरोपही शिवसेनेतर्फे करण्यात आला होता. त्यामुळे महाजन आणि शिवसेनेत आता खऱ्या अर्थाने वैर निर्माण झाले आहे. याशिवाय महाजन यांनी गेल्या पाच वर्षात शिवसैनिकांना त्रास दिला असल्याचा आरोप शिवसेनेचे जळगाव लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी त्यांचे नाव न घेता नुकताच जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. 

.. त्यासाठी हवेत खडसे 
खडसे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत जळगावातील नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी सावंत विमानाने जळगावला आले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी खडसे यांचे विश्‍वासू माजी आमदार गुरुमुख जगवानीही त्यांच्या सोबत होते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत अधिक चर्चा सुरू झाल्या होत्या. याच वेळी सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गेल्या पाच वर्षांत अधिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे आता यापुढे अशा त्रासाला उत्तर देण्यासाठी खडसे पक्षात आल्यास पक्षाला फायदा होणार आहे. पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तेही त्यांना घेण्यास अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले होते. जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जळगावात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा अहवाल नेतृत्वाकडे दिला आहे. 

खडसेंवरील राग संपुष्टात 
खडसे यांनी 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेशी युती तोडली होती. त्यामुळे शिवसेनेचा त्यांच्यावर राग होता, असे सांगितले जात होते. मात्र जिल्हा संपर्कप्रमुख सावंत यांनी जळगाव येथेच खुलासा केला होता की त्यावेळी ते भाजपमध्ये होते त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी तो निर्णय योग्य होता. शिवसेनेत आल्यावर ते शिवसेना वाढीसाठी निर्णय घेतील. यामुळे शिवसेनेचा पक्षावरचा रागही कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

राष्ट्रवादीचे नेते अनभिज्ञ 
दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसही त्यांच्या प्रवेशासाठी तयार आहे. स्थानिक नेते काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसले तरी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मात्र खडसे यांच्या प्रवेशासाठी चांगलेच अनुकूल आहेत. विशेष म्हणजे खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा, यासाठी त्यांच्या समर्थकाचीही अनुकूलता आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या प्रवेशाचा घोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता खडसे यांच्यावरच हा निर्णय सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचे कोडे मंगळवारी (ता.24) मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी उलगडेल असेही सांगण्यात येत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com