खानदेशाही "नमो नमो' 

खानदेशाही "नमो नमो' 

जळगाव : खानदेशातील तीन जागांवर अंतर्गत गटबाजीने जोर धरल्यानंतरही चारही मतदारसंघात भाजपने "शत-प्रतिशत' कामगिरी करत निर्भेळ यश मिळविले. धुळे मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सव्वा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे पडलेल्या डॉ. हीना गावीत यांनी नंदूरबारमधून पुन्हा एकदा 95 हजारांवर मताधिक्‍य घेत बाजी मारली. रावेरमधून अपेक्षेप्रमाणे रक्षा खडसे यांनी तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍याने विजय मिळविला, तर जळगावमधून उन्मेश पाटील यांनी विक्रमी चार लाखांवर लीड घेत बाजी मारली आहे. 

रावेर वगळता धुळे, नंदूरबार आणि अगदी जळगावातही भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आलेली असताना खानदेशात पुन्हा एकदा 2014ची पुनरावृत्ती झाली. या चारही मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर लाखांवर मताधिक्‍याने बाजी मारली आहे. यावेळच्या निवडणुकीत खरेतर नंदूरबार व धुळ्याची भाजपची जागा धोक्‍यात असल्याचे मानले जात होते, त्यातही सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये डॉ. हीना गावीत मागे पडल्याने या पारंपरिक गडावर कॉंग्रेसची "वापसी' होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते,अंतिमत: हीना गावीत यांनी पुन्हा एकदा हा गड काबीज केला. 

डॉ. भामरे पुन्हा दिल्लीत 
धुळे मतदारसंघात यावेळी प्रथमच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील व अमरिशभाई पटेल यांनी एकदिलाने सोबत काम केले. मात्र, तरीही कॉंग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांना ते विजयापर्यंत पोचवू शकले नाही. मतदान झाल्यानंतरही याठिकाणी डॉ.भामरेंच्या विजयाबद्दल साशंकता व्यक्त होत होती. मात्र, निकालाअंती डॉ. भामरे यांनी सव्वा दोन लाखांचे मताधिक्‍य घेत विजयश्री खेचून आणली. धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांची बंडखोरी अगदीच निष्प्रभ ठरली, त्यांना पाच आकडी मतेही गाठता आली नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांनी मात्र 39 हजारांहून अधिक मते घेतली. 

कॉंग्रेसच्या गडात पुन्हा डॉ. हीना 
धुळ्याप्रमाणे नंदुरबारमध्येही भाजपला बंडखोरीला सामोरे जावे लागले. शिवाय, डॉ. हीना गावीत यांच्या विजयाबद्दलही शंका निर्माण करण्यात आली. सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये कॉंग्रेस उमेदवार ऍड. के.सी. पाडवी यांनी आघाडी घेतल्याने भाजपच्या गोटात घबराट पसरली. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये डॉ. गावीत यांनी विजयी आघाडी कायम ठेवली. निकालाअंती हीना गावीत 95 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्यात. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ. नटावदकर यांना 12 हजार 820 मतेच मिळविता आली. 

रावेरमध्ये रक्षा खडसेच! 
खानदेशातील या एकमेव जागेबाबत नेतृत्व निश्‍चिंत होते. रावेरला एकनाथराव खडसेंच्या स्नुषा व विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेस उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा तब्बल 3 लाख 35 हजार 882 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे रावेर मतदारसंघातील सर्वच विधानसभा क्षेत्रांत रक्षा खडसेंना मोठी आघाडी मिळाली आहे. रक्षा खडसेंना 6 लाख 55 हजार 386 मते मिळाली. याठिकाणी "वंचित'चे उमेदवार नितीन कांडेलकर यांनी तब्बल 88 हजार 365 मते घेतली. रावेरची जागा कॉंग्रेसला ऐनवेळी सोडण्यात आली, तरीही डॉ. उल्हास पाटील यांनी 3 लाख 19 हजार 504 मते घेतली. 

उन्मेश पाटलांना विक्रमी मताधिक्‍य 
विद्यमान खासदार ए.टी. पाटलांचे कापलेले तिकीट, स्मिता वाघ यांना दिलेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करुन भाजपने चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटलांना मैदानात उतरविले. तरीही, पाटील यांनी जळगाव मतदारसंघातून तब्बल 4 लाख 10 हजारांहून अधिक मतांचे मताधिक्‍य घेऊन बाजी मारली आहे. त्यांना सुमारे 7 लाख 11 हजार 588 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना जवळपास 3 लाख 1 हजार 268 मते मिळाली. या मतदारसंघात "वंचित' आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांनी 37 हजार 350 मते मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com