हायपरटेंशनचा त्रासानंतरही रनिंगची नशा थांबली नाही : किशोर धनकुडे 

हायपरटेंशनचा त्रासानंतरही रनिंगची नशा थांबली नाही : किशोर धनकुडे 

 
जळगाव ः शाळा, महाविद्यालयीन जीवनापासून शंभर मीटर, चारशे मीटर धावण्यात स्ट्रॉंग बेस राहिला होता. कालांतराने सायकलिंग करायला लागलो. यानंतर काही मॅरेथॉनही धावल्या. वयाच्या 26 व्या वर्षापर्यंत फिजिकली फिट होतो. परंतु, लग्नानंतर फिटनेसकडे दुर्लक्ष झाले. साधारण आठ- नऊ वर्ष पूर्णपणे लक्ष देता आले नाही. याच दरम्यान हायपरटेंशनचा त्रास जाणवू लागला होता. पण गोळ्या घेऊन त्रास कमी करण्यापेक्षा मैदानावर उतरून फिट राहायचे हे मनाशी ठरविले. यामुळे हायपरटेंशनची शेवटची गोळी घेतली आणि ठरविले की यापुढे गोळी घ्यायची नाही; आणि आजपर्यंत गोळी घेतली नाही. कारण रनिंगची जी नशा होती; ती न थांबल्यानेच हे शक्‍य झाल्याचे खानदेश रनचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर गिर्यारोहक किशोर धनकुडे यांनी सांगितले. 

"सकाळ'च्या औद्योगिक वसाहतीमधील कार्यालयात "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमांतर्गत दिलखुलासपणे गप्पा मारताना श्री. धनकुडे यांनी धावपटू ते गिर्यारोहक झाल्यापर्यंतचा प्रवास उलगडला. 

वेगळे काही करण्याचा विचार 
लग्नानंतर फिटनेसकडे लक्ष न देवू शकल्याचा त्रास जाणवू लागला होता. यात वयाच्या 36 व्या वर्षी हायपरटेंशनचा त्रास होत असल्याचे जाणवले. यामध्ये बराच कालावधी गेला. पण 40 व्या वर्षी आपण काही वेगळे करायचे हा विचार मनात आला. हळूहळू 2009 मध्ये पुन्हा ट्रेनिंगला सुरवात केली. यानंतर 2012 मध्ये पहिली हाफ मॅरेथॉन धावलो आणि येथून धावण्याची पुन्हा सुरवात झाली. पहिली फूल मॅरेथॉन स्पर्धा गोवा येथे धावलो. पुणे आंतरराष्ट्रीय हाफ मॅरेथॉन एक तास तीस मिनिटांत, मुंबई- पुणे मॅरेथॉन साडेतीन तास, तर आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन (89 किलोमीटर) साडेनऊ तासात पूर्ण केली. 

तीन महिन्यांची डेडलाईन निश्‍चित 
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टप्पे लहान असायला हवेत. म्हणजेच फिजिकली स्ट्रॉंग राहू शकतो. याकरिता स्वतः तीन महिन्यांची डेडलाईन ठरवून घेतली आहे. कारण 90 दिवसानंतर आपली मसल मेमरी ही ब्रेक होत असते. दर तीन महिन्यानंतर मसल स्ट्रॉंग केल्याने आपण फिट राहू शकतो आणि केव्हाही खेळण्यास तयार होऊ शकतो. ही डेडलाईन असल्याने मला केव्हीही 41 किमी धावण्यास सांगितले, तरी अवघ्या तीस मिनिटात तयार होऊन धावू शकतो, असे धनकुडे यांनी सांगितले. 

उत्तर- दक्षिणेकडून एव्हरेस्ट सर 
रनिंग, सायकलिंग करण्यासोबत एव्हरेस्ट चढण्याचे निश्‍चित केले. त्या दृष्टीने तयारी करत 26 दिवसांचा मॉन्टेसरी कोर्स पूर्ण केला. जून 2012 मध्ये 6 हजार मीटर उंचीचा देवरीवार्क सर केले. सप्टेंबर 2012 मध्ये सतोपंत टेक्‍निकल माऊंटन सर केले होते. हे केल्यानंतर 2014 साली माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे ठरविले. याबद्दल सुरवातीला घरच्यांना देखील सांगितले नव्हते. परंतु, चीनमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट तयार करण्याच्यावेळी घरच्यांना माहीत झाले. एव्हरेस्ट चढण्याची कठीण बाजू समजली जाणारी उत्तरेकडून म्हणजे चीनच्या बाजूने माऊंट एव्हरेस्ट सर केले. साधारण दीड महिन्यात पुढील वर्षी एव्हरेस्ट सर करण्यात यशस्वी झालो. लागलीच पुढल्या वर्षी दुसऱ्या बाजूने चढण्याचे ठरविले होते. परंतु हिमकडे कोसळल्यामुळे प्रशासनाने सर्व मोहिमा स्थगित केल्याने चढाई करता आली नाही. मात्र 20 मे 2017 ला दक्षिणेकडून म्हणजे नेपाळच्या बाजूकडून एव्हरेस्ट सर केले. 

एव्हरेस्टकरिता अमावशेला ट्रेनिंग 
माउंट एव्हरेस्ट सर करण्यापूर्वी रनिंगचा सराव केला. पुण्याच्याजवळ असलेल्या कात्रज बोगदा ते सिंहगड (के टू एस) असे रोज धावण्याचा सराव होता. एव्हरेस्टच्या प्रॅक्‍टिसचा सराव प्रामुख्याने अमावशेच्या रात्री देखील केला आहे. कात्रज बोगद्याला रात्री बारा वाजता जाऊन धावण्यास सुरवात केली की सिंहगड येथे सकाळी पोहचत असल्याचे धनकुडे यांनी सांगितले. याशिवाय सायकलिंगमध्ये पुणे- गोवा हा टिम इव्हेंट केला. हे अंतर तीस तासात पूर्ण केले. 

शासनाकडून मदत नाही 
उत्तरेकडून म्हणजे चीनकडून एव्हरेस्ट चढण्याची पहिली कामगिरी करणारा महाराष्ट्रातील एकमेव ठरलो. यानंतर दक्षिणेकडून पुन्हा एव्हरेस्ट सर केले. असे दोन्ही बाजूंनी एव्हरेस्ट सर करणारा देशातील एकमेव राहिलो असताना देखील महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. केवळ तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला हेच माझ्यासाठी बक्षीस ठरले. या उलट आंध्रप्रदेशातील एका युवतीने एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केल्यानंतर आंध्र सरकारने तिला 25 लाख रुपये आणि पाच एकर शेती देण्यात आली होती. शासनाकडून काही मिळाले नसले, तरी माझ्यामुळे दहा व्यक्‍तींनी एव्हरेस्ट सर केले; हीच माझ्यासाठी मोठीबाब असल्याचे धनकुडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com