वीस हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात "किसान सन्मान' निधी 

वीस हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात "किसान सन्मान' निधी 

जळगाव ः शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ आज ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 
आमदार सुरेश भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल 
भोकरे, "एनआयसी'चे प्रमुख प्रमोद बोरोले, महात्मा फुले कृषी विज्ञापिठाचे डॉ. सुदाम पाटील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. बाहेती, "नाबार्ड'चे श्रीकांत झांबरे, निवड झालेले शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, की जिल्हा प्रशासनासह कृषी, महसूल, कृषी विज्ञापीठ यांच्यातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम 79.52 टक्के पूर्ण केले असून, लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अभिनव पद्धतीचा वापर करून पाण्याचे योग्य नियोजन करून कमीखर्चात जास्त उत्पादन काढण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पोचविण्यासाठी काही त्रुटी किंवा अडचणी असल्यास लाभार्थ्यांनी ग्रामपातळीवर, तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर तयार करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करावी. 
श्री. ठाकूर म्हणाले, की 2 लाख 27 हजार 743 शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पोहोचणार आहे. हा निधी लाभार्थ्यांनी आपल्या शेतीतील उत्पन्न वाढीसाठी, अडीअडचणीसाठी खर्च करून निधी सत्कार्मी लावावा. दरवर्षी 3 हप्त्यात 6 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होईल. डॉ. बाहेती यांनी योजनेविषयी माहिती दिली. 
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ गोरखपूर उत्तर प्रदेश येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आधुनिक पद्धतीचा वापर करून डिजिटल पद्धतीने करण्यात येऊन त्याचे थेट प्रक्षेपण देशवासीयांना दाखविण्यात आले. "मन की बात' या कार्यक्रमाच्या प्रसारणात प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान, शेतकऱ्यांबद्दल गौरवोद्‌गार काढले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com