सहा वर्षांनंतर तरणतलावाचे सुटले "ग्रहण'! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

जळगाव ः छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील तरणतलाव जुलै 2012 मध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर बंद करण्यात आला होता. या प्रकरणानंतर तलावात सुचविण्यात आलेल्या सुधारणा आणि दुरुस्ती करण्यास तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला. या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर तलावाचे "ग्रहण' सुटले असून, जलतरणपटूंसाठी तलाव आजपासून खुला झाला आहे. 

जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात जुलै 2012 मध्ये विश्‍व शहा या सहावर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. तेव्हापासून तलाव सुरक्षिततेच्या कारणातून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर तलाव तब्बल सहा वर्षे बंद राहिला. यामुळे जलतरणपटूंना सरावासाठी जागा राहिली नव्हती. विश्‍व शहा मृत्यू प्रकरणानंतर तलावात करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दोन समित्या नियुक्‍त केल्या होत्या. शिवाय, समितीतील मुंबईतील एका संघटनेने तलावासंदर्भात काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या. त्यानुसार दुरुस्तीचे काम करून नवीन तलाव उभारण्यात आला आहे. जलतरण तलाव चालविण्याचे काम भुसावळ येथील "आर. बी. एन्टरप्रायजेस'ला देण्यात आले आहे. 

तलाव झाला खुला 
जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात सुचविण्यात आलेल्या दुरुस्तीप्रमाणे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेल्या जलतरण तलावाचे उद्‌घाटन आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. जलतरण तलावाची सुविधा माफक दरात "ना नफा- ना तोटा' या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षक राहुल सूर्यवंशी, ललित सूर्यवंशी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. उद्‌घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, जी. टी. महाजन, संजय वानखेडे, गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon krida sankul jaltaran talav