महिला पोलिसाचा जाच; शेतकऱ्याची आत्महत्या 

महिला पोलिसाचा जाच; शेतकऱ्याची आत्महत्या 

जळगाव : महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीच्या वादातून महिला पोलिसाने दिराचा छळ केल्यानंतर या जाचास कंटाळून ममुराबाद (ता. जळगाव) येथील शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 
मृत शेतकरी भरत गणपत सपकाळे (वय 40) कुटुंबीयांसह येथील दिनकरनगरात वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नी तक्रारदार आशा भरत सपकाळे यांच्या तक्रारीनुसार त्यांचे सासरे गणपत सपकाळे यांना कैलास, भरत, सती अशी तीन मुले आणि कुसुम प्रदीप सूर्यवंशी, प्रतिभा चंद्रकांत सोनवणे या मुली आहेत. सपकाळे कुटुंबाची ममुराबाद परिसरात शेतजमीन असून, नुकतीच ही जमीन शासनाने संपादित केली आहे. त्याचा येणारा पैसा भाऊ-बहिणींमध्ये समान वाटप होणार होता. मात्र, मोठा भाऊ कैलास सपकाळेची पत्नी प्रवीणा जाधव यांच्याकडून जादा हिश्‍श्‍यासाठी दबाव आणला जात होता. हा त्रास सहन न झाल्याने 11 मार्चला सायंकाळी भरत सपकाळेंनी शेतात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालय व तेथून खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर उपचार सुरू होते. मात्र, काल सकाळी भरत सपकाळेंचा मृत्यू ओढवल्यावर शनिपेठ पोलिस ठाण्यात महिला पोलिस प्रवीणा जाधव यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे तपास करीत आहेत. 

मरणासन्न असतानाही दबाव 
भरत सपकाळेंना शहरात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना 18 मार्चला प्रवीणा जाधव यांनी रुग्णालयात येऊन "माझे नाव घेऊ नका.. आपण भरत सपकाळेने दारूच्या नशेत विषप्राशन केल्याचा आपण स्टॅम्प करून घेऊ', असे म्हणत नणंदेच्या नावाने स्टॅम्प लिहूनही आणला. मात्र, सपकाळे कुटुंबीयांनी स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला होता. 

प्रवीणा "एमआयडीसी' ठाण्यात कार्यरत 
प्रवीणा जाधव या एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठ पोलिस अधिकारी घडलेल्या प्रकाराबाबत काय कारवाई करतात, याकडे सपकाळे कुटुंबीयांचे लक्ष लागून आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com