वाहून गेलेला तरुण तीस तासांनंतरही सापडेना! 

live photo
live photo

जळगाव ः येथील अयोध्यानगराजवळील नाल्याला काल झालेल्या पावसामुळे पूर आला होता. या पुरात इतर नागरिकांना मदत करणारा तरुण पाय घसरून नाल्यात पडून वाहून गेला. या तरुणाचा आज सकाळी आठपासून आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने नाल्याचा सुमारे पंधरा किलोमीटरपर्यंत शोध घेऊनही मृतदेह सापडलेला नाही. उद्या (18 ऑगस्ट) पुन्हा शोधकार्य केले जाणार आहे. 
अयोध्यानगराजवळील लक्ष्मीनारायणनगरात राहणारे हेमंत अरुण वाणी (वय 40) काल नाल्याच्या पुरात पाय घसरून वाहून गेल्याची घटना घडली. त्यानंतर महापालिका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून या तरुणाचा शोध घेणे सुरू होते. आज सकाळी आठला तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यानगरातील पुलापासून शोधकार्य सुरू केले. पथकाने थेट नाल्यातून चालत जाऊन पाच मोरी नाल्यापर्यंत शोध घेतला. तसेच नाल्याच्या आजूबाजूच्या परिसरातील झुडपांत शोध घेतला. 

दोन सत्रांत शोधकार्य 
आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने आज सकाळी तहसीलदार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू केले. यामध्ये घटनास्थळापासून ते थेट पाच मोरीपर्यंत नाल्यामधून चालून शोध तीनपर्यंत घेतला. एक तास जेवण केल्यानंतर दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंत असोद्याजवळील लौकी नाल्यापर्यंत असा सुमारे घटनास्थळापासून पंधरा किलोमीटर परिसरातील नाल्यात शोध घेतला. 

आई-वडील चिंतेत 
नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले हेमंत वाणी यांच्या घरी आज चिंतेचे वातावरण होते. वृद्ध 
आई-वडील वाहून गेलेला मुलगा आज तरी सापडेल, या आशेने वाट बघत होते. 

पथकात यांचा होता सहभाग 
तहसीलदार अमोल निकम, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथकात फायरमन अश्‍वजित धराडे, रोहिदास चौधरी, गंगाधर कोळी, वसंत कोळी, वाहनचालक देविदास सुरवाडे, सोपान जाधव, सोपान कोल्हे, शशिकांत बारी, वाहनचालक प्रदीप धनगर. 

दहा फूट उंच झुडपात शोध 
विद्यानगर पुलाच्या पुढे दोन किलोमीटरनंतर असोद्याकडे जाणाऱ्या नाल्यात दहा ते पंधरा फूट उंच झुडपांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने शोधकार्य केले. यात नाल्यात पुरात वाहून आलेले झाड, फांद्या, तसेच अडकलेला थर्माकोल, प्लास्टिक कचऱ्याच्या खालीही शोध घेऊनही वाणी यांचा मृतदेह सापडला नाही. 

पथकातील कर्मचारीही थोडक्‍यात बचावला 
पथकातील पाच जण लौकी नाल्यात उतरून शोध घेत होते. याचवेळी एक मोठा साप पथकातील फायरमन धराडे यांच्या अगदी जवळून गेला. त्यामुळे ते थोडक्‍यात बचावले. तसेच दहा ते पंधरा फूट उंच झुडपातही शोध घेताना अनेक अडथळे शोधकार्य करणाऱ्या पथकाला आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com