भारनियमनाच्या "भेटी'नंतर आता पाणीकपातीचे संकट 

भारनियमनाच्या "भेटी'नंतर आता पाणीकपातीचे संकट 


"दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण जळगावकरांसाठीच तयार झालीय का, असा प्रश्‍न नेहमीच पडतो. एकतर अत्यल्प पावसाने शेतकरीवर्गासह साऱ्यांनाच चिंताग्रस्त केलंय, तर दुसरीकडे "ऑक्‍टोबर हीट'मध्ये भारनियमनाचे चटके तीव्र झाल्याने जगणं असह्य झालंय. वर्षभरात जळगावचा चेहरामोहरा बदलू, अशी साद घालत जळगाव महापालिकेची सूत्रे ताब्यात घेणाऱ्या गिरीश महाजनांच्या "टीम'ला "विजयोत्सव' साजरा करण्याचा महिना उलटत नाही, तोच जळगाववर पाणीकपातीचे संकट घोंगावू लागले आहे. कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यात हीच स्थिती आहे. आगामी काळात टंचाईची तीव्रता वाढेल, तसा पाणीप्रश्‍न पेटू लागेल. त्यातून दिलासा देण्याची कसरत प्रशासनास करावी लागेल... 
 

यंदा जळगाव जिल्ह्यासह खानदेशातही अत्यल्प पाऊस झाला. खरीप हंगाम हातचा गेला. परतीच्या पावसानेही निराशा केली आणि प्रकल्प कोरडेठाकच राहिले. वाहून निघणारा एकही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. कमी- अधिक प्रमाणात राज्यातील बहुतांश भागांची हीच स्थिती असल्याने राज्यावर उत्पादन घट आणि दुष्काळाची गडद छाया कायम आहे. जळगाव जिल्ह्यात तर ऐन पावसाळ्यातही टंचाईचे चटके कायम होते. त्यामुळे जिल्ह्यातील स्थिती आता पुढे जाऊन आणखी बिकट होणार आहे. त्यातूनच ज्या प्रकल्पांमध्ये थोडाफार साठा आहे, त्यासाठी आता वाद सुरू झाले आहेत. 

गिरणा धरणातून भोकरबारी व अन्य लघुप्रकल्पांमध्ये पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे, तर प्रशासनाने धोरणानुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्यक्रम देत साठा पिण्यासाठी आरक्षित करण्याच्या निर्णयांचा धडाका लावला आहे. वाघूर धरणातील पाण्यावर जामनेर, जळगाव महापालिकेसह काही गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र, शेतकऱ्यांनी हे पाणी शेतीसाठी द्यावे, अशी मागणी लावून धरली आहे. अर्थात, "वाघूर'मधील साठाही मर्यादित असल्याने ते पाणी पुढच्या जुलैपर्यंत पुरवायचे असेल, तर त्याचे योग्य नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. पाण्याच्या या संभाव्य नियोजनातूनच अनेक वाद उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. दसऱ्याच्या दिवशी रावणदहनाच्या उत्सवात जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले. त्यानंतर महापालिकेत बैठक होऊन दिवाळीनंतर पाणीकपात करण्याचे संकेत देण्यात आले. जळगावकरांनी भाजपला पहिल्यांदाच महापालिकेतील सत्तेचे "गिफ्ट' दिल्यानंतर मोठ्या विकासाची अपेक्षा असताना निसर्गाच्या प्रकोपाने का होईना, महापालिका प्रशासन जळगावकरांना पाणीकपातीचे "रिटर्न गिफ्ट' देणार काय? आणि दिले तर कधी देणार? वाघूर धरणातील साठा संपुष्टात आला, तर जळगावकरांना पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नाही, अशा स्थितीत प्रशासन काय करणार, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत. 

अर्ध्या जळगाव जिल्ह्याची व शेतीची तहान गिरणा धरण भागवतेय. मात्र, त्या धरणाच्या वर चार धरणे असून, ती भरल्याशिवाय "गिरणा'त पाणी येत नाही. सद्य:स्थितीत गिरणा धरणात 40 टक्केच साठा आहे. त्यातून जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला किती पाणी येते, याबाबत शंका आहे. त्यामुळे भविष्यात जळगाव जिल्ह्यात पाण्याचा प्रश्‍न बिकट होणार असून, त्याचे योग्य नियोजन करण्याची कसरत जलसंपदामंत्री म्हणून महाजनांना करावी लागेल. त्यांच्यासाठी ते मोठे आव्हानच असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com