शोध जळगाव ग्रामीण उमेदवाराचा..! 

शोध जळगाव ग्रामीण उमेदवाराचा..! 

जळगाव : "शत-प्रतिशत भाजप' असा नारा देत भाजपने केंद्रात सत्ता मिळवीत राज्यांमध्येही आपला सत्तेचा वारू चौखूर उधळवला. जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकाही ताब्यात घेतल्या आहेत. आता लोकसभा आणि विधानसभेची पक्षातर्फे तयारी सुरू आहे. या निवडणुकांचा विचार केल्यास अनेक ठिकाणी पक्षाकडे तुल्यबळ उमेदवारांत स्पर्धा आहे. मात्र, जळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजपकडे अद्यापही उमेदवारांचा शोध आहे. शिवसेना उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर हे प्रतिस्पर्धी असणार आहेत. परंतु भाजपतर्फे कोण? याबाबत अद्यापही प्रश्‍नचिन्ह आहे. 
..... 

"मंत्रिपद'देणारा जळगाव ग्रामीण हा "लकी' मतदार संघ असल्याची चर्चा गेल्या दोन पंचवार्षिकपासून राजकीय क्षेत्रात सुरू आहे. गुलाबराव देवकर या मतदार संघातून प्रथमच राष्ट्रवादीतर्फे निवडून आले आणि त्यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. त्यानंतर शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील या मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आणि त्यांनाही मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामुळे या मतदार संघाकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. 

धरणगाव, नशिराबाद ही दोन मोठी गावे असलेला मतदारसंघ जळगाव आणि धरणगाव तालुक्‍यात विभागला आहे. जळगाव तालुका क्षेत्रात एकेकाळी सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व होते. जळगाव विधानसभेत जळगाव तालुका क्षेत्र असताना प्रत्येक वेळी या भागातून जैन यांना मोठे मताधिक्‍य मिळाले आहे. जळगाव ग्रामीणमध्ये तालुका गेल्यानंतर या मतदारसंघाचे राजकीय आणि जातीय समीकरणही बदलले. मराठा, गुजर, कोळी आणि लेवा पाटील बहुल असा हा मतदार संघ झाला आहे. त्यामुळे जातीनिहायही उमेदवाराच्या विजयाचे राजकीय गणित बांधणेही कठीण आहे. त्यामुळे पक्षनिहायच या मतदारसंघात उमेदवाराला बाजी मारता येते, हेच दोन वेळा दिसून आले आहे. 

पक्षांतर्गत उमेदवाराच्या विधानसभेच्या तयारीत निश्‍चितच शिवसेना अग्रक्रमावर आहेत. राज्यमंत्री पाटील यांनी मतदार संघात तयारी सुरू केली आहे. परिसरात विकासाच्या कामांसाठी निधीची उपलब्ध करून महत्त्वाचे म्हणजे रस्त्याचे काम सुरू केल्याचे दिसत आहेत. तसेच विकासकामांच्या भूमिपूजनाचा त्यांनी धडकाही लावला आहे. या शिवाय त्यांनी प्रत्येक गावात संपर्क सुरू ठेवला आहे. या माध्यमातून ते आपल्या उमेदवारीचाच नव्हे, तर यशाचा दावाही भक्कम करीत आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांनाही तेवढ्याच तोडीचा उमेदवार देवून गतीने तयारी करावी लागणार आहे. 

विरोधी पक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे पुन्हा एकदा माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी मिळणार, हे निश्‍चित आहे. ते मंत्री पाटील यांना जोरदारपणे टक्कर देवू शकतील, याची पक्षाला खात्रीही आहे. देवकर यांनीही अगोदरच मतदारसंघात संपर्काद्वारे बांधणी सुरू केली आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी भक्‍कम उमेदवारांच्या शोधात आहे. देवकर यांची ताकद पाहता ते लोकसभेत भाजपचे तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे पक्षातर्फे देवकर यांना उमेदवारी मिळू शकते. अशा स्थितीत मात्र विधानसभेसाठी देवकर यांचे सुपुत्र विशाल देवकर यांचाही विचार होऊ शकतो. या शिवाय जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार यांच्या नावाबाबतही पक्ष विचार करू शकतो. 

भारतीय जनता पक्ष विधानसभेत मोठ्या यशासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी त्यांनी सर्वच मतदार संघात आतापासून तयारी सुरू केली आहे. परंतु जळगाव ग्रामीणमध्ये भाजपकडे सध्यातरी तुल्यबळ उमेदवार दिसत नाही. गेल्यावेळी पी. सी. पाटील यांनी लढत दिली आणि तब्बल 46 हजार मते मिळविली. परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. जळगाव ग्रामीणमध्ये भाजपची फारशी ताकद नव्हती. परंतु तीन जिल्हा परिषदेत प्रभाकर सोनवणे, माधुरी अत्तरदे व लालचंद प्रभाकर पाटील हे तीन भाजपचे सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेच्या बरोबरीने भाजपचे सदस्य आहेत. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. तरीही पक्षाकडे विधानसभेत तुल्यबळ उमेदवार दृष्टिपथात नाही. 

जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे उमेदवार म्हणून पाहिले जात होते, तशी चर्चाही होती. मात्र, कोल्हे यांनी आपण या मतदार संघातून लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भुसावळचे भाजपचे स्वीकृत नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे. चंद्रशेखर अत्तरदे यांच्या पत्नी माधुरी अत्तरदे याच मतदारसंघात भाजपच्या जि. प. सदस्या आहेत. या शिवाय जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोटू सोनवणे यांनाही उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, ऐनवेळी पक्ष कोणाला उमेदवारी देणार, याबाबत आता पक्ष कार्यकर्त्यातही उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com