Loksabha 2019 : चाळीसगाव विधानसभा क्षेत्र : भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीही जोरात 

Loksabha 2019 : चाळीसगाव विधानसभा क्षेत्र : भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीही जोरात 

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ २००९ पासून खुला झाला. या मतदारसंघाची मते लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरत आली आहेत. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुखांनी बाजी मारल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी ताकद वाढली. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना अपयश आल्यानंतर भाजपच्या उन्मेष पाटील यांच्यामुळे पुन्हा भाजपचे प्राबल्य वाढले आहे. त्यांच्यात पक्षातील विरोध त्यांच्या विरोधात एकत्र आले असले तरी या लोकसभा निवडणुकीत आमदार उन्मेष पाटील यांच्यावरच पक्षाची मदार राहणार आहे. 
 
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात १९६२ ते १९७२ पर्यंत काँग्रेसचे आमदार होते. १९७८ व १९८० च्या निवडणुकीत डी. डी. चव्हाण अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर १९८५ मध्ये काँग्रेसचे वासुदेव चांगरे आमदार झाले. त्यानंतर मात्र भाजपच्यात उमेदवाराला या मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी मिळाली. १९९० ला ॲड. ईश्‍वर जाधव व त्यानंतर १९९५, १९९९ व २००४ च्या निवडणुकीत भाजपचे प्रा. साहेबराव घोडे विजयी झाले होते. या काळात तालुक्यात भाजपची ताकद वाढली. २००९ मध्ये मात्र भाजपला यश आले नाही. राष्ट्रवादीचे राजीव देशमुख विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये उन्मेष पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून भाजप फार्मात आहे. सध्या पक्षांतर्गत गटबाजी असली तरी उन्मेष पाटलांनी त्यांच्यापासून वेगळे झालेल्यांना फारसा थारा न देता त्यांचे काम सुरुच ठेवले आहे. 

अनेक संस्थांवर यश 
आमदार उन्मेष पाटील आमदार झाल्यानंतर त्यांनी पंचायत समिती, नगरपालिका व बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली. जिल्हा परिषदेच्या चौदा पैकी सात गटांत भाजपचे सदस्य निवडून आले आहेत. ही खरे तर आमदार उन्मेष पाटलांच्या जमेची बाजू आहे. हे होत असताना अनेक कारणांमुळे त्यांच्याच पक्षातील विशेषतः जुने पदाधिकारी त्यांच्यापासून दूर गेले आहेत. त्यामुळे तालुक्यात भाजपमध्ये दोन गट उघडउघड दिसून येतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचे दोन्ही गट पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असले तरी विधानसभेच्या निवडणुकीत मात्र असे चित्र दिसून येईलच हे सांगता येत नाही. तालुक्यातील अनेक संस्थांसह ग्रामपंचायतींवर उन्मेष पाटलांनी मिळवलेले यश ही त्यांच्या व्यक्तिगत कर्तबगारीची किमया असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ‘मायक्रो प्लानिंग’ने आपल्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी निर्माण केली असून, जे आज त्यांच्यासोबत नाहीत, त्याचा त्यांना काहीही फरक पडणार नाही, असे त्यांचे कार्यकर्ते ठामपणे सांगतात. आपल्या विरोधकांचा फारसा विचार न करता सुरवातीपासूनच उन्मेष पाटलांनी मतदारसंघातील बरेचसे रखडलेले प्रश्‍न मार्गी लावून शासनाकडून भरीव निधी आणला हे विरोधक देखील मान्य करतात. 

राष्ट्रवादी फार्मात 
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा राजीव देशमुखांना मानणारा वर्ग अधिक आहे. मागील विधानसभा निवडणुकीत देशमुखांना यश आले नसले तरी यावेळची विधानसभा काहीही करून जिंकायचीच, याची तयारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच केली आहे. पालिकेत भाजपच्या नगराध्यक्षा असल्या तरी ३४ पैकी १७ नगरसेवक राजीव देशमुखांचे आहेत. पंचायत समितीतही चौदा पैकी सात व जिल्हा परिषदेत सात पैकी चार सदस्य त्यांचेच आहेत. शेतकी संघही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. बाजार समितीत भाजपचे सदस्य निवडून आले असले तरी प्रत्यक्षात कामकाज मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शिवाय भाजपच्या विशेषतः नाराज गटातील अनेक जण अप्रत्यक्षरित्या राजीव देशमुखांसोबत आहेत. एकूणच ही सर्व परिस्थिती राजीव देशमुखांना अनुकूल आहे. लोकसभेच्या निवडणुकीत याच तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या गुलाबराव देवकरांना उमेदवारी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. 

शिवसेना काय करणार? 
भाजप- शिवसेनेची युती असली तरी तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार न करण्याचे ठरवले आहे. निवडणुकीपुरताच भाजपवाले शिवसेनेला सोबत घेतात, निवडून आल्यानंतर शिवसेनेला विचारतही नाही, असे सांगत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, अशी मागणी केली आहे. यापूर्वीचे भाजपचे खासदार तथा माजी मंत्री एम. के. पाटील यांचे लाच प्रकरण आणि आताच्या लोकप्रतिनिधी संदर्भात व्हायरल झालेल्या फोटोचे प्रकरण पाहता, हा मतदारसंघ भाजपच्या लोकप्रतिनिधीमुळे बदनाम झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना काय करणार? हे येणाऱ्या काळातच दिसून येईल. 

चित्रसेन पाटलांचे यश 
ज्या बेलगंगा साखर कारखान्याच्या विषयावर अनेकांनी आपली पोळी शेकून राजकारण केले, तो बेलगंगा कारखाना सत्ताधाऱ्यांना सुरू करण्यात अपयश आले. कारखान्याचे एकेकाळी चेअरमन असलेल्या चित्रसेन पाटील यांनी स्थानिक उद्योगपती व भूमिपुत्रांना सोबत घेऊन लोकसहभागाची चळवळ गतीमान करून कारखाना सुरू केला. राजकीय सत्ता असली म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून विकास साधणे सोपे जाते, हे ओळखूनच चित्रसेन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीला गेले होते. त्यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. आता तर त्यांनी बेलगंगा कारखाना विकत घेऊन सुरू करून दाखवल्याने त्यांनी लोकसभेची नाही तर विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह होत आहे. आज त्यांच्या सोबत वेगवेगळ्या पक्षांना मानणारे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. मात्र, जेव्हा चित्रसेन पाटलांच्या उमेदवारीचा विषय येईल, तेव्हा ते त्यांच्यासोबत राहतील यात शंका नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत चित्रसेन पाटलांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. 
 
मतदारसंघातील प्रश्‍न 
० नार- पार योजनेचे रखडलेले काम 
० बंद असलेली चाळीसगाव टेक्स्टाईल मिल 
० ‘एमआयडीसी’त आणखीन मोठे उद्योग 
० कन्नड घाटातून ‘टनेल’ मार्ग 
० सिंचन प्रकल्पातून प्रत्यक्ष केंद्राची मदत मिळणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com