Loksabha 2019 : "ए.टी.'नी उमेदवारी केल्यास भाजपला अवघड जाणार 

Loksabha 2019 : "ए.टी.'नी उमेदवारी केल्यास भाजपला अवघड जाणार 

भडगाव : भाजपने विद्यमान खासदारांना डावलून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेले ए. टी. पाटील हे वेगळी चूल मांडून उमेदवारी करण्याचे संकेत मिळत आहे. त्यांनी उमेदवारी केल्यास राज्यात सर्वत्र भाजपला विजय मिळवून देणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यात भाजपला पुन्हा गड राखणे अवघड होणार आहे. 
पूर्वीचा एरंडोल व आता जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्रात भाजपचा पहिला खासदार या मतदारसंघानेच दिला आहे. कॉंग्रेसचे विजय नवल पाटील व पोटनिवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादीचे ऍड. वसंतराव मोरे यांचा अपवाद वगळला तर भाजपचाच येथे खासदार राहिला आहे. यावेळी मात्र भाजपचा हा गड डगमगीत होण्याचे चिन्हे दिसत आहे. 

खासदारांच्या कार्यकर्त्यांचा संताप 
जळगाव मतदारसंघात सलग दोन टर्मपासून ए. टी. पाटील यांनी मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजय मिळवला होता. यावेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एक "क्‍लीप' व्हायरल झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर टाच आली. संघाचा व पक्षाचा अहवाल त्यांच्या बाजूने होता असे सांगितले जाते. तरीही त्यांचे तिकीट कापले गेले. त्यामुळे खासदार ए. टी. पाटील हे चांगलेच संतापले आहेत. ते परवा घरी आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या घरी गर्दी करीत त्यांना समर्थन दिले. "तुम्ही जो निर्णय घ्याल तो, आम्ही तुमच्या सोबत राहू' असे कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे ते भाजपला धडा शिकवण्यासाठी बंड करण्याच्या तयारीत दिसत आहेत. 

...तर भाजपला फटका 
विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी केल्यास, भाजपला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. ते सलग दोन टर्मपासून खासदार असल्याने त्यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. ते मराठा पाटील असून त्यांचे प्रत्येक गावात नातेगोतेही मोठे आहे. तर त्यांना भाजपमधूनही अंतर्गत पाठिंबा मिळू शकतो. शिवाय भाजपमधील नाराज गट उघडपणे त्यांना मदत करू शकतो. त्यांचा दुधाचा व्यवसाय असून मोठा मित्र परिवार देखील आहे. इतर पक्षातील त्यांचे मित्र छुप्या पद्धतीने त्यांचे काम करू शकतात. दोन निवडणुकांपासून तो दिसून आला आहे. त्यामुळे भाजपला त्यांची उमेदवारी डोकेदुखी ठरू शकते. 
 
भाजपचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान 
भाजपच्या बालेकिल्ल्याची तटबंदी फोडण्याची चिन्हे यंदा दिसत आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यात राष्ट्रवादीने माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांना उमेदवारी देऊन भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण करून आघाडी घेतली आहे. भाजपचे बूथ नेटवर्क मजबूत आहे. राज्याची निवडणूक हाताळणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यात भाजपला पुन्हा गड राखण्याचे मोठे आव्हान आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com