Loksabha 2019 : जिल्ह्यातील दोन्ही खासदार जनतेची कामे करण्यात अपयशी : ऍड. रवींद्र पाटील 

ravindra patil
ravindra patil

जळगाव : केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. सत्ताधारी पक्षाचे जळगाव व रावेर मतदार संघातील दोन्ही खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. दोन्ही मतदार संघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच आघाडीचा उमेदवारच निवडून येईल, असा आपल्याला ठाम विश्‍वास आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी "सकाळ संवाद' कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने "सकाळ'च्या गोलाणी संकुलातील शहर कार्यालयात ऍड. पाटील यांच्याशी पक्षाची तयारी, सरकारची कामगिरी या विविध मुद्यांवर चर्चा केली असता त्यांनी आपली भूमिका मांडली. 

प्रश्‍न : जळगाव लोकसभा मतदारसंघातील आपली तयारी कशी? 
उत्तर : कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची परिस्थिती चांगली आहे. पक्षाने गुलाबराव देवकर यांच्या माध्यमातून जळगाव लोकसभा मतदार संघात भक्कम उमेदवार दिला आहे. त्यांचे सहकार क्षेत्रात काम आहे, मंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. धरणगावात पुलाची उभारणी केली, जळगावात नाट्यगृह बांधले, असोदा येथे बहिणाबाई चौधरी स्मारकाचे काम सुरू केले. या शिवाय रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे केली. त्यामुळे त्यांचा फायदा निश्‍चितच निवडणुकीत होईल. रावेर मतदार संघातही चांगला उमेदवार दिला जाईल. 


प्रश्‍न : देवकर यांनी विधानसभेची तयारी केली होती? 
उत्तर : होय, निश्‍चितच देवकर यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातून तयारी केली होती. लोकसभेत पक्ष जो उमेदवार देईल. त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू, अशी त्यांनी ग्वाहीही दिली होती, मात्र सर्वे आणि जनमत तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने त्यांचे नाव सुचविले होते. आणि नेत्यांनीही त्यांच्या कामावर विश्‍वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्याचा आम्हाला निश्‍चित फायदा होईल. 

प्रश्‍न : निवडणुकीत कॉंग्रेसची तुम्हा साथ मिळेल काय? 
उत्तर : निश्‍चितच! कॉंग्रेसची आम्हाला चांगली साथ मिळेल, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सोबत राहूनच प्रचार करतील. आता नुकतेच आम्ही कार्यकर्त्याचे शिबिरही घेतले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संयुक्तपणे काम करून यश मिळवतील. 

प्रश्‍न : भाजपचा उमेदवार कोण असेल? 
उत्तर : भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण? हा त्यांचा प्रश्‍न आहे, त्याबाबत आपण जास्त बोलणार नाही. मात्र दोन्ही खासदारांच्या कामाबाबत जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. फार दूर नाही, अगदी शिवाजीनगर पुलाचा प्रश्‍न घेतला तरी जनतेला असलेला त्रास दिसून येईल. पर्यायी मार्गाची सुविधा केल्याशिवाय शिवाजीनगर पुलाचे काम सुरू करण्याची गरज नव्हती. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही सरकार यांचेच आहे. त्यांनी जर पर्यायी मार्गाची सुविधा केली असती तर आज जनतेचा त्रास वाचला असता. असे अनेक प्रश्‍न आहेत. ते त्यांनी सोडविलेच नाहीत. त्यामुळे भाजपचा उमेदवार कोणीही असला तरी फरक पडणार नाही हे निश्‍चित. 

प्रश्‍न : प्रचारात कोणते मुद्दे असतील? 
उत्तर : शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही झालेली नाही, शेतमालाला भाव मिळालेला नाही, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्यांचे आश्‍वासन दिले; परंतु या शासनाच्या काळात एकही नोकरी मिळालेली नाही. असे अनेक प्रश्‍न आहेत. आम्ही ते प्रचारात मांडणार आहोत. 

प्रश्‍न : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची बूथ यंत्रणा कमकुवत असल्याचे म्हटले जाते? 
उत्तर : नाही, आम्ही बूथ यंत्रणा मजबूत केलेली आहे, शहरी आणि ग्रामीण स्तरावर आमची यंत्रणा सज्ज आहे, आम्ही स्वत: त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला आहे. त्यामुळे बूथ स्तरावरही आमची रचना चांगली आहे. 

प्रश्‍न : मोदी लाट पुन्हा येईल काय? 
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवून जनतेने त्यांना निवडून दिले होते. मात्र त्यांच्या घोषणा भूलथापाच ठरल्या आहेत, असे जनतेला दिसून आले आहे. त्यामुळे जनतेची निराशा झाली आहे. पुलवामा येथे लष्कराच्या जवानावर झालेल्या हल्ल्याचाही फायदा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. जनतेमध्ये त्याबद्दल मोठी नाराजी आहे. त्यामुळे यावेळी मोदी लाट असणार नाही हे निश्‍चित आहे. 

प्रश्‍न : रावेर लोकसभा मतदार संघाचा उमेदवार कोण असेल? 
उत्तर : रावेर लोकसभा मतदार संघाचा निर्णय पक्षाचे नेते शरद पवार घेतील. कॉंग्रेसनेही या जागेची मागणी केली आहे. त्यामुळे पक्षाचे नेते शरद पवार आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयानुसार जो उमेदवार दिला जाईल. त्याचा संयुक्तपणे प्रचार करण्यात करून तो उमेदवार आम्ही निश्‍चित निवडून आणू. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com