लोकसभेसाठी शिवसेनेचे "स्वबळ', भाजप "बॅकफूट'वर! 

लोकसभेसाठी शिवसेनेचे "स्वबळ', भाजप "बॅकफूट'वर! 

जळगाव : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाली असून, जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही लोकसभ मतदारसंघांत आघाडीच्या माध्यमातून उमेदवार असणार आहेत. त्यातच दुसरीकडे शिवसेना आणि भाजप स्वबळाची तयारी करीत आहेत. मात्र, वरिष्ठ स्तरावर यासंदर्भात निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची मैत्री वगळता दोन्ही पक्ष एकमेकांचे शत्रू म्हणूनच लढत आहेत. त्यात शिवसेनेने लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात माजी मंत्री आर. ओ. पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे. दुसरीकडे रावेर मतदारसंघातही पक्षाने उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या स्वबळामुळे भाजप मात्र सध्यातरी सर्वच बाबतीत "बॅकफूट'वर आहे. 
जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा विचार केल्यास शिवसेना व भाजप संयुक्तपणे लढल्याने आजपर्यंत या दोन्ही मतदारसंघांत भाजपला यश मिळाले. विशेष म्हणजे लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे भाजपच्या उमेदवारांचे काम केले. त्यामुळे भाजपची या दोन्ही मतदारसंघांत नेहमीच सरशी झालेली आहे. मात्र यावेळी शिवसेनेने वरिष्ठ स्तरापासून स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून युती होण्याचा दावा करण्यात येत असला तरी शिवसेना मात्र "अकेला चलो'च्याच मूडमध्ये असल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यात उद्या (24 डिसेंबर) पंढरपूर येथे पांडुरंगाच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घोषणा करण्याचीही शक्‍यता आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा विचार केल्यास शिवसेना आणि भाजप प्रत्येक निवडणुकीत एकमेकांचे शत्रूच राहिले आहेत. त्यात लोकसभा स्वतंत्र लढण्याचा आता शिवसैनिकांचाही मूड आहे, विशेष म्हणजे लोकसभेच्या जळगाव मतदारसंघासाठी पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या उमेदवारीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यांनी प्रचार कार्य सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपली उमेदवारी कायमच राहील असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे रावेर लोकसभेसाठी शिवसेनेने चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या उमेदवारीच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आता शिवसेना उमेदवारासह तयार आहे. 

शिवसेना-भाजपच शत्रूच 
लोकसभा निवडणूक वगळल्यास जिल्ह्यात चार वर्षात भाजप व शिवसेना स्वतंत्रपणेच निवडणुका लढले आहेत. अगदी जिल्हा परिषदेच्या सत्तेत गेल्या पंधरा वर्षाची असलेली युती यावेळी मोडली आहे. या ठिकाणीही सत्तेत भाजपने सेनेला सोबत घेतले नाहीत. त्यामुळे ठिकाणी सेना विरोधीच आहे. तर नुकत्याच झालेल्या जामनेर, मुक्ताईनगर ,पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रच लढले आहेत. तर जळगाव महापालिकेत तर दोन्ही पक्ष एकमेकाविरुद्ध आमने-सामने लढले असून आताही एकमेकांचे विरोधी आहेत. अशा स्थितीत आता लोकसभेत युती झाली तरी दोन्ही लोकसभेत कार्यकर्ते किती सचोटीने कार्य करतील याबाबत साशंकताच आहे. 


भाजपचे "बॅकफूट' 
जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही जागा टिकविणे मोठे आव्हानच असणार आहे. अगोदरच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत मोठी दरी निर्माण झाली आहे, हे पक्षाचे नेतेही आता मान्य करीत आहेत. त्यामुळे ती साधत असतानाच मित्र पक्ष शिवसेना आता दूर गेली आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची मैत्री हाच एकच दुवा आहे. परंतु तोही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना मान्य होण्याची चिन्हे नाहीच. या शिवाय जलसंपदामंत्री महाजन हे चाणाक्ष आहेत. निवडणुकीतील भाजपचे यश हेच त्यांच्या राज्य स्तरावरील नेतृत्वाची चढती कमान आहे हे ते विसरणार नाहीत, त्यामुळे भाजप-सेनेच्या मैत्रीचे जिल्ह्यात वेगळे चित्र असेल, असा विश्‍वास बाळगणे चुकीचे ठरणार आहे. दुसरीकडे एकनाथराव खडसे यांना मंत्रिमंडळातून दूर सारून पक्षाने अन्याय केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हे मत कार्यकर्त्यांनी उघडपणे व्यक्त केले आहे. खडसेंसह कार्यकर्त्यांचा हा रोषही भाजपला जड जाणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सद्य:स्थितीत पक्षाला "घरघर' लागली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या रणांगणात उतरण्यामुळे मोठा फटका बसणार आहे. विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीपेक्षा त्यांच्यासमोर हेच मोठे आव्हान असणार आहे. त्यात दोन्ही मतदारसंघात उमेदवारीबाबत भारतीय जनता पक्ष अद्याप अंधारातच आहे. दोन्ही ठिकाणी खासदार आहेत. परंतु पक्षाने अद्यापही त्यांना निवडणुकीच्या उमेदवारीची खात्री दिलेली नाही, त्यामुळे सध्यातरी जिल्ह्यात भाजप "बॅकफूट'वर असल्याचे चित्र आहे, एवढे मात्र निश्‍चित. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com