Loksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी करण्यात महाजन यांचा हातखंडा आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला जळगावात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी करण्यात महाजन यांचा हातखंडा आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला जळगावात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 
जळगाव येथे केमिस्ट भवन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, की भारतीय जनता पक्षाची ताकद असल्याचा पक्षाचे नेते दावा करीत आहेत. मात्र, आमचे नाकारलेले उमेदवार आयात करण्याची मानसिकता भाजपमध्ये दिसून येत आहे. 
 
महाजनांचा उमेदवारी चोरीत हातखंडा 
उद्धव ठाकरे व गिरीश महाजनांच्या बाबतीत पाटील म्हणाले, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात, असे उद्धव ठाकरे म्हणतात, परंतु आम्ही त्यांना घाबरत नाही, उलट उद्धव ठाकरेच त्यांना घाबरत असतील, उमेदवारी चोरीत गिरीश महाजन यांचा हातखंडा आहे. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील उपस्थित होते. 
 
कोल्हापूरला गर्दीसाठी कानडी श्रोते 

कोल्हापूर येथे युतीची सभा झाली, त्या ठिकाणी पाच जिल्ह्यांतून माणसे आणल्यानंतरही गर्दी होत नसल्यामुळे चक्क बेळगाव येथून कानडी श्रोते त्यांना आणावे लागले, हीच भाजप-सेनेची शोकांतिका आहे. 
 
पाकच्या पंतप्रधानांना गुपचूप संदेश का? : आव्हाड 
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, की भारतीय जनता पक्षाचे नेते पाकिस्तानला विरोध असल्याचे दाखवीत असतात, मात्र त्यांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना गुपचूप शुभेच्छा संदेश पाठवितात. जर त्यांना संदेश पाठवायचा होता तर तो जाहीरपणे का नाही पाठविला. ते लपून छपून त्या देशाविरुद्ध प्रेम दाखवीत आहेत. यामुळे त्यांचा पाकिस्तान विरोध हा बेगडी दिसत आहे. या देशातील इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याची या सरकारची मानसिकता आता दिसायला लागली आहे. मंडल आयोगाचे पुनर्विलोकन करण्यासाठी त्यांनी गुपचूप समिती नियुक्त केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

..त्यामुळेच महाजनांना मातोश्रीवर प्रवेश नाही 
उद्धव ठाकरे यांनी विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात, असे वक्तव्य केले. त्याचा समाचार आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही घेतला. ते म्हणाले, की आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरेच त्यांना घाबरतात. त्यामुळेच ते महाजनांना मातोश्रीवर प्रवेश देत नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon loksabha girish mahajan jayant patil