चिखलात गेलेला रस्ता लोकवर्गणीतून केला दुरुस्त 

भूषण श्रीखंडे
मंगळवार, 16 जुलै 2019

जळगाव : काळ ठरणारा महामार्ग असो, की खड्ड्यांमुळे मृत्यूचे सापळे बनलेले शहरातील अंतर्गत रस्ते.. त्यातून प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय अनास्थेचे बळी सामान्य नागरिक ठरतांय.. वाहन चालविणे तर दूरच रस्त्यांवरून चालणेही कठीण झालेले... अशा स्थितीत वाढीव व पर्यायाने उपेक्षित वस्तीतील लोक एकत्र येतात, लोकवर्गणी करतात.. आणि त्यातून चिखलाने माखलेला रस्ता दुरुस्त करतात.. हा उपक्रम आदर्श असला तरी स्थानिक यंत्रणेची अब्रू काढणारा असाच आहे. 

जळगाव : काळ ठरणारा महामार्ग असो, की खड्ड्यांमुळे मृत्यूचे सापळे बनलेले शहरातील अंतर्गत रस्ते.. त्यातून प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय अनास्थेचे बळी सामान्य नागरिक ठरतांय.. वाहन चालविणे तर दूरच रस्त्यांवरून चालणेही कठीण झालेले... अशा स्थितीत वाढीव व पर्यायाने उपेक्षित वस्तीतील लोक एकत्र येतात, लोकवर्गणी करतात.. आणि त्यातून चिखलाने माखलेला रस्ता दुरुस्त करतात.. हा उपक्रम आदर्श असला तरी स्थानिक यंत्रणेची अब्रू काढणारा असाच आहे. 

शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील गिरणा पंपिंग रस्त्यावरील नवीन वस्ती असलेल्या श्‍यामनगरात नागरी सुविधांचा पत्ताच नाही. ना पक्‍क्‍या गटारी, ना रस्ते. अर्ध्या भागात पथदिवे नसल्याने अंधार व अर्ध्या भागात जलवाहिनी नसल्याने पिण्याच्या पाण्यापासून देखील अनेक नागरिक वंचित. अशा स्थितीत पावसाळा लागला आणि रस्त्यांची दुर्दशा आणखी तीव्रतेने समोर आली. चिखलातील रस्त्यांवर चालणेही कठीण. 

चिखलामुळे कोणी येईना 
श्‍यामनगरात प्रवेश करणारा मुख्य रस्ता पावसामुळे चिखलमय झाला होता. रस्त्यात चिखल असल्याने दुचाकी, चारचाकी वाहने फसत होते. त्यामुळे पालकांना मुलांना स्कूलबसपर्यंत चिखलातून गिरणा पंपिंग रस्त्यापर्यंत जावे लागत होते. तसेच घरोघरी उकड्याचे दूध द्यायला येणारे व अन्य विक्रेते या परिसरात येण्यास नकार देत आहेत. 

लाखावर खर्च केला जमा 
मुख्य रस्ता चिखलामुळे बंद झाल्याने श्‍यामनगरातील रहिवासी एकत्र आले. काही नागरिकांनी प्रभागातील नगरसेवकांकडे जाऊन मदत मागितली, पण काही उपयोग झाला नाही. मग, नागरिकांनी स्वत:च लोकवर्गणी गोळा करण्याचे ठरवून प्रत्येकी हजार रुपये गोळा केले. त्यातून एक लाख 10 हजारांचा निधी जमा झाला. त्यातून या चिखलातील रस्त्यात मुरूम, खडीचा कच टाकून तो दुरुस्त केला. 

माजी महापौरांच्या वॉर्डात असुविधा 
श्‍यामनगर प्रभाग क्रमांक अकराचा भाग आहे. माजी महापौर तथा विद्यमान सभागृहनेते ललित कोल्हे व त्यांच्या आई सिंधू कोल्हे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या पत्नी उषा पाटील, पार्वताबाई भिल यांचा हा प्रभाग; परंतु या वाढीव वस्त्यांकडे या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. 

प्रश्‍न सोडविण्यासाठी एकत्र 
ऍड. राजेश गवई (सरकारी वकील)
: रस्ता, पाणी, वीज या खरेतर नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळी मोठ्या घोषणा करतात; परंतु श्‍यामनगरातील सर्व रहिवासी एकत्र लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या भरोसे न राहता लोकसहभागातून हा रस्ता तयार करून आदर्श निर्माण केला आहे. 
 
रस्ता केल्याचे समाधान 
सागर पाटील, (नागरिक)
: रस्ता कोण तयार करून देईल या वादात न पडता सर्व रहिवाशांची विकासाचा एक दृष्टिकोन ठेवला. सर्वांनी एकत्र येत लोकसहभागातून या रस्ता तयार केल्याचा एक आत्मिक समाधान मिळाले. 

मनपाकडून दखल नाहीच 
किशोर पाटील (नागरिक
) : दरवर्षी पावसाळा आला, की या रस्त्याची समस्या आम्हाला भेडसावत होती. महापालिकेला तक्रार करून ही याची दखल घेतली नाही. यंदा जास्त त्रास असल्याने सर्वांनी एकत्र येऊन नाइलाजास्तव खिशातले पैसे खर्चून हा रस्ता तयार केला. 

कर भरूनही असुविधा 
उत्तम चव्हाण (नागरिक
) : आम्ही मालमत्ताकर भरतो तर महापालिकेने नागरी सुविधा देणे त्यांचे कर्तव्य आहे. चिखलात वाहने फसणे, घसरून पडणे असे प्रकार घडत होते. त्यामुळे जीव मुठीत घेऊन यावे लागत होते. लोकसहभागातूनच आमचा रस्ता दुरुस्त करण्याचे ठरवले आणि ते पूर्ण केले. 

मतभेद दूर ठेवून काम 
पी. आर. पाटील (नागरिक) : श्‍यामनगरातील रहिवाशांनी एकत्र येत मतभेद बाजूला ठेवून रस्ता दुरुस्त करायचे ठरवले. लोकसहभाग, लोकवर्गणीतून रस्त्याचे काम सुरू करून ते पूर्ण केले. आता या रस्त्यावरून लहान मुले, महिला, वयोवृद्ध येऊ जाऊ शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lokvargani 1.5 lakh road repair