"महाजनादेश'च्या वादळात कॉंग्रेस, राष्ट्रवादी शाबूत 

"महाजनादेश'च्या वादळात कॉंग्रेस, राष्ट्रवादी शाबूत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यात जनतेशी संवाद साधण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली होती. त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला, त्यापेक्षा यात्रेनिमित्त इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या "मेगाभरती'चीही अधिक चर्चा झाली. ज्या जिल्ह्यातून यात्रा गेली, त्या ठिकाणी इतर पक्षांतून भाजपत कोण प्रवेश करणार याचीच चर्चा होत होती. खानदेशात यात्रेने प्रवेश केला, त्यावेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांच्या प्रवेशाची चर्चा होती. या पक्षांतराच्या वादळात विरोधी पक्ष कसा टिकणार, याकडेही लक्ष होते. मात्र, महाजनादेश यात्रेतील पक्षांतराच्या वादळात उत्तर महाराष्ट्रात विरोधी पक्षात कोणतीही मोठी पडझड झाली नाही. सध्या तरी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस खानदेशात या वावटळीतून शाबूत राहिली. 

राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जोरदार "इनकमिंग' सुरू आहे. दोन्ही पक्षांतील विद्यमान आमदार तसेच नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेत काही जिल्ह्यात विरोधी पक्षातील आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ही यात्रा ही एक प्रकारे पक्षांतर करणाऱ्यांना प्रवेश देणारी यात्राही ठरली. खानदेशात ही यात्रा आल्यास मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजपत प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष व कॉंग्रेसचे दिग्गज चंद्रकांत रघुवंशी, शिरपूरचे कॉंग्रेसचे माजी आमदार अमरीशभाई पटेल, धुळे येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले राजवर्धन कदमबांडे, कॉंग्रेसचे ग्रामीणचे विद्यमान आमदार कुणाल पाटील हे धुळे व नंदुरबार येथील महाजनादेश यात्रेत भाजपत प्रवेश करण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसना मोठा हादरा बसण्याची चिन्हे होती. 

या भागात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढविण्यात या नेत्यांचा निश्‍चित सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष होते. जळगाव जिल्ह्यातही कॉंग्रेस व राष्ट्रवादीची मोठी पडझड होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन हे भाजपत प्रवेश करण्याबाबतची जोरदार चर्चा होती. त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रवेशाबाबत भेट घेतल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. या शिवाय रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रवेशाबाबतचे वृत्तही सोशल मीडियावर चर्चेत होते. मात्र, चौधरी यांनी हे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे अगोदरच सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत त्याच वेळी पूर्णविराम मिळाला. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचाही मोठा वाटा आहे. आगामी विधानसभेत मोठे यश मिळविण्यासाठीही त्यांची तयारी सुरू आहे. खानदेशसह उत्तर महाराष्ट्रात मोठे यश मिळविण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेत खानदेशात मोठ्या प्रमाणात भाजपत "इनकमिंग' होईल, अशी चर्चा होती. पण, त्यात फारसे यश आले नाही. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन पक्षांतराचा करिष्मा घडविणार काय, याकडेच आता लक्ष राहणार आहे. 

बुरुजाचे थोडेसे नुकसान 
नंदुरबारचे कॉंग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित, शहाद्याचे माजी आमदार (कै.) पी. के. अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटील यांचे महाजनादेश यात्रेत भाजपत प्रवेश झाले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या किल्ल्याच्या बुरुजाचे थोडेसे नुकसान झाले. परंतु, त्या शिवाय कोणत्याही दिग्गज नेत्याने "कमळ' हाती न घेता "पंजा' आणि "घड्याळा'सोबतच राहण्याचे ठरविले आणि महाजनादेशच्या वावटळीत खानदेशात कॉंग्रेस व राष्ट्रवादी शाबूत राहिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com