जळगाव आगारात वाहक उदंड! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळात (एस.टी.) "चालक कम वाहक' या संकल्पनेवर आता नियुक्‍ती केली जात आहे. अनेक फेऱ्याही अशाच धावत आहेत. असे असताना जळगाव आगारात वाहकसंख्या अपेक्षित पदांपेक्षा जास्त झाली आहे. यात जवळच्या वाहकांना तत्काळ ड्यूटी मिळते; मात्र अनेकांना सक्‍तीच्या रजेवर जावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळात (एस.टी.) "चालक कम वाहक' या संकल्पनेवर आता नियुक्‍ती केली जात आहे. अनेक फेऱ्याही अशाच धावत आहेत. असे असताना जळगाव आगारात वाहकसंख्या अपेक्षित पदांपेक्षा जास्त झाली आहे. यात जवळच्या वाहकांना तत्काळ ड्यूटी मिळते; मात्र अनेकांना सक्‍तीच्या रजेवर जावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 
"एस.टी.'तर्फे राज्यभर बससेवा सुरू आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आवश्‍यक कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या असणे आवश्‍यक आहे. कर्मचाऱ्यांची संख्याच कमी असल्याने वेळेवर बस सोडून उत्पन्नवाढ कठीण असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपूर्वी होते. परंतु, आज चित्र बदलले असून, चालक आणि वाहकांची जळगाव आगारातील संख्या पुरेशी नव्हे; तर अपेक्षित संख्येपेक्षा जास्त झाल्याचे सध्या चित्र आहे. यात गेल्या दोन वर्षांत "चालक कम वाहक' या संकल्पनेवर नियुक्‍ती दिली जात असल्याने वाहकांच्या नोकरीचा प्रश्‍न उद्‌भवणार, अशी भीती व्यक्‍त केली जात होती. सद्यःस्थितीला जळगाव विभागात 2 हजार 138 चालकांची पदे मंजूर असून, यापैकी 1 हजार 767 चालक नियुक्‍त आहेत. तर 2 हजार 124 वाहकांपैकी 1 हजार 651 नियुक्‍त आहेत. जळगाव विभागातील चित्र उलटे असून, वाहकसंख्या अधिक झाली आहे. यामुळे वाहकांची इच्छा नसताना त्यांना सक्‍तीच्या रजेवर जावे लागते. 

जळगावसाठी आग्रही 
महामंडळाच्या जळगाव विभागांतर्गत पंधरा आगारांमधून वाहक व चालकांकडून जळगाव, चोपडा आणि यावल या आगारांत जाण्यास पसंती दिली जाते. यात जळगाव आगारात काही महिन्यांपूर्वी जवळपास तीनशे वाहक होते. यातील काही सेवानिवृत्त झाल्याने सध्या 281 वाहक आहेत. तुलनेत चालकांची संख्या कमी आहे. चाळीसगाव, रावेर व मुक्‍ताईनगर या आगारांत जाण्यास कोणी तयार नाही. अर्थात अन्य विभागांतून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांकडून रिक्‍त जागेच्या ठिकाणी बदली झाल्यानंतर वाहकांकडून जळगावसाठी आग्रह धरला जातो. या आग्रहाला "आर्थिक' कृपा लाभते. या प्रकरणांसाठी स्थानक आवारात काही एजंट फिरतात. या एजंटना साधून आर्थिक व्यवहार करून जळगाव आगारात बदली करून घेतली जाते. यामुळेच जळगाव आगारात सद्यःस्थितीत 30 वाहक जास्तीचे ठरत आहेत. 

सक्‍तीच्या रजेने आर्थिक भुर्दंड 
महामंडळाच्या नियमानुसार चालक किंवा वाहकाला सेवाकाळात आल्यानंतर चार तासांच्या आत बसफेऱ्यांसाठी सेवा देण्यात आली नाही किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही, तर त्या कर्मचाऱ्याला त्या दिवसाचा पगार दिला जातो. परंतु जळगाव आगारात वाहकांना चार-पाच तासांवर होऊनही बसफेरी निश्‍चित होत नाही. अर्थात वाहकसंख्याही यास कारणीभूत ठरत आहे. म्हणजेच यात वशिला असलेल्या वाहकांना लवकर ड्यूटी मिळते; तर वशिला नसलेल्यांकडून रजेचा अर्ज लिहून सक्‍तीने रजेवर पाठविले जाते. या रजेचा आर्थिक भुर्दंड वाहकांनाच बसतो. कारण महामंडळाच्या नियमानुसार पगारी रजा न देता दिलेली रजा ही बिनपगारी दिली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 

Web Title: marathi news jalgaon mahamandal st condacter aditinal