चौपदरीकरण कामासाठी आता स्वतंत्र अधिकारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली अशा जळगाव जिल्ह्याच्या टप्प्यांतील चौपदरीकरणाच्या दोन्ही कामांवर लक्ष ठेवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. चौपदरीकरणाच्या दररोजच्या कामाची प्रगती, आढावा घेणे यामुळे सुलभ होणार असून त्यासाठी जळगावात कार्यालयही सुरू करण्यात आले आहे. 

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली अशा जळगाव जिल्ह्याच्या टप्प्यांतील चौपदरीकरणाच्या दोन्ही कामांवर लक्ष ठेवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. चौपदरीकरणाच्या दररोजच्या कामाची प्रगती, आढावा घेणे यामुळे सुलभ होणार असून त्यासाठी जळगावात कार्यालयही सुरू करण्यात आले आहे. 
नवापूर-अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यात गेल्या तीन वर्षांत नवापूर ते फागणे या टप्प्यातील काम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे. तर फागणे-तरसोद व तरसोद-चिखली या दोन्ही टप्प्यांतील कामे रखडली होती. ही कामे गेल्या सहा महिन्यांत सुरू झाली. 

धुळ्यात कार्यालयाने अडचण 
महामार्ग चौपदरीकरणाच्या या दोन्ही कामांसाठी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी व प्रकल्प अभियंता यांचे कार्यालय धुळे येथे आहे. काम जळगाव जिल्ह्यातील असूनही कार्यालय धुळ्यात असल्याने या कामाचा आढावा घेणे कठीण जात होते. शिवाय धुळेस्थित कार्यालयातील प्रकल्प अधिकाऱ्यांकडे धुळे-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचीही जबाबदारी होती. त्यामुळे या दोन्ही कामांवर लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नव्हता. 

नवे अधिकारी, स्वतंत्र कार्यालय 
महामार्ग चौपदरीकरण कामाकडे लक्ष देण्यातील अडचण लक्षात घेऊन व जळगाव जिल्ह्यातील टप्प्यांचे काम गतीने पूर्ण व्हावे, यासाठी महामार्ग प्राधिकरणाने सी. एम. सिन्हा या स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. जळगावात कार्यालयही सुरू झाले असून, कामाचे स्वरूप व दिवसेंदिवस वाढत जाणारी व्याप्ती पाहता मोठ्या कार्यालयासाठी निविदाही काढण्यात आली आहे. 
 
दोन्ही टप्प्यांतील कामाचे स्वरूप असे 
फागणे ते तरसोद : 87.3 कि. मी. 
अपेक्षित खर्च : 940 कोटी रुपये 
मक्तेदार कंपनी : एमबीएल इन्फ्रास्ट्रक्‍चर 
तरसोद ते चिखली : 62.7 कि. मी. 
अपेक्षित खर्च : 948 कोटी 25 लाख 
मक्तेदार कंपनी : वेल्प्सन इन्फ्रास्ट्रक्‍चर 
 
महामार्ग चौपदरीकरणाच्या जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काम वेळेत व गुणवत्तापूर्ण कसे होईल, याकडे लक्ष ठेवले जाईल. दररोज कामाचा आढावा घेऊन ते वेळेत पूर्ण करण्यावर भर असेल. 
- सी. एम. सिन्हा, अभियंता, महामार्ग प्राधिकरण 
 

Web Title: marathi news jalgaon mahamarg chopadrikaran