महामार्ग दुरुस्तीसाठीचे 11 कोटीही खड्ड्यात!

live photo
live photo

जळगाव : जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 मृत्यूचा सापळाच ठरलेला आहे. वाहनचालकाचे थोडे दुर्लक्ष झाले, तरी केव्हा अपघात होईल, हे सांगता येत नाही. गेल्या वर्षी रस्ते अपघातात जिल्ह्यातील साडेचारशे नागरिकांचे बळी गेल्याचे चित्र समोर आले आहे. जखमींची संख्याही दीड हजारांवर असून, या अपघातांना वाहनचालकांच्या चुका जशा कारणीभूत आहेत, तशी महामार्गाची अवस्थाही. दररोज होणारे अपघात, त्यात जाणाऱ्या बळींची संख्या लक्षात घेता एप्रिल 2017 मध्ये महामार्गावरील साइडपट्ट्यांच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील खड्डे बुजविणे व साइडपट्ट्या बुजविण्याची निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) काढली होती. दहा कोटी 84 लाख रुपयांचा ठेका दिला गेला. महामार्गावरील खड्ड्यांसह साइडपट्ट्या दुरुस्तीचे काम या निधीतून सहा महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत होती. प्रत्यक्षात काम सुरूही झाले. मात्र, ते मर्यादित स्वरूपात. या निधीतून मंजूर कामही पूर्ण झालेले नसताना अकरा कोटींचा हा निधीही खड्ड्यातच गेला, अशी ओरड वाहनधारकांमधून सुरू झाली आहे. 

राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षभरापूर्वी महामार्गाच्या अवस्थेबद्दल बरीच ओरड झाली. सातत्याने होणारे अपघात, त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती व अपघातांचे वाढते प्रमाण आजही कायम आहे. महामार्गातील खड्डे, खचलेल्या साइडपट्ट्या यामुळे अपघात वाढले, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आणि त्यासाठी महामार्ग दुरुस्तीची मागणीही जोर धरू लागली. लोकप्रतिनिधींनीही जोर लावल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) महामार्ग दुरुस्तीसाठी निधी मंजूर करत निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार अग्रवाल कन्स्ट्रक्‍शन्सची दहा कोटी 84 लाख रुपये खर्चाची निविदा मंजूर झाली. 

काम सुरू, पण.. 
गेल्या वर्षी एप्रिल-मेमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्ग क्र. 6 वरील साइडपट्ट्या बुजविण्यासाठी अग्रवाल कन्स्ट्रक्‍शनला साइडपट्ट्या भरण्याचा ठेका दिला. मे व पावसाळ्यात अनेक ठिकाणी साइडपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. मात्र, साइडपट्ट्या तयार करण्याची तांत्रिक पद्धत न वापरता केवळ मुरुम टाकला गेला. साइडपट्ट्यांचे काम निकृष्ट होत असल्याबाबत काही सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कामांचा दर्जा निकृष्ट असल्याबाबतची माहिती दिली. 
जिल्हाधिकाऱ्यांनी कामांच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. "न्हाई'च्या अधिकाऱ्यांनी तेव्हा सुरू असलेले काम कच्चे असेल. पावसाळ्यानंतर साइडपट्ट्या पुन्हा भरून पक्‍क्‍या केल्या जातील, असे सांगितले होते. पावसाळ्यानंतर आठ महिने उलटले तरी महामार्गाच्या साइडपट्ट्या पक्‍क्‍या करण्यात आलेल्या नाहीत. 

अपघात नित्याचेच! 
साइडपट्ट्या व महामार्ग यामध्ये किमान अर्धा फुटाचे अंतर अनेक ठिकाणी आहे. ठिकठिकाणी केवळ मुरुम पसरवलेला आहे. या मुरुमावरून दुचाकी नेल्यास पंक्‍चर किंवा घसरतात. महामार्गावर मागून मोठे वाहन आल्यास दुचाकीचालकाला रोडखाली उतरावेच लागते, साइडपट्ट्यांवर त्या ठिकाणी मुरुम असल्याने दुचाकीस्वार महामार्गाखाली ती उतरवत नाही. मोठ्या वाहनांचे चालक थेट दुचाकीला धडकतात. यात मोठे अपघात होतात. साइडपट्ट्या भरण्यासाठी कंत्राट दिलेले असताना संबंधित कंत्राटदार कामे करीत नाही, यावर "न्हाई'चे अधिकारी बोलण्यास नकार देतात. ते फक्त काम सुरू असल्याचे सांगतात. 

चांगल्या साइडपट्ट्या ठराविक ठिकाणी 
साकेगावजवळील (ता. भुसावळ) गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय ते नशिराबादजवळील टोलनाक्‍यापर्यंत साइडपट्टयांचे काम पक्के झाले आहे. येथे कधी अपघात होत नाहीत. तसे काम जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाने करणे कंत्राटदाराकडून अपेक्षित आहे. मात्र अधिकारी त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात, असा आरोप नागरिक करीत आहेत. 

साइडपट्टी समतोल करणे गरजेचे 
महामार्गावरील साइडपट्ट्या अनेक ठिकाणी उतरत्या असून त्यात व्यवस्थित भर टाकून तो महामार्गाशी समतोल करणे गरजेचे आहे. अन्यथा दहा कोटी रुपये केवळ मुरुम टाकून तो पसरवण्यात गेल्याचे म्हणता येईल. सध्याची साइडपट्ट्यांची स्थिती पाहता दहा कोटी 84 लाख रुपये निधी खड्ड्यात गेल्याची ओरड नागरिक करू लागले आहेत. 

साइडपट्ट्या नसल्याने अपघात 
एरंडोल : राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच साइड पट्ट्यांमुळे रस्त्यापासून खोल गेल्यामुळे अपघातात वाढ होऊन अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहनचालक त्रस्त आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रस्त्याच्या मध्यभागी ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच साइडपट्ट्या सुमारे एक ते दीड फूट खोल गेल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा तसेच खोल साइडपट्ट्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे अपघात होत असतात. महामार्गावरील टेलिफोन एक्‍स्चेंज, दत्त मंदिर, नवीन धारागीर, हॉटेल प्रियांका पॅलेस व धरणगाव चौफुली या ठिकाणी कायम अपघात होत असतात. सहा महिन्यांच्या कालावधीत या रस्त्यावर अनेक गंभीर अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच सद्यःस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झाला असल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या मुळे रस्त्यापासून सुमारे एक ते दीड फूट खोल गेल्या असून यामुळे देखील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच नवीन बसस्थानक परिसरात राष्ट्रीय महामार्गालगतच अतिक्रमण करण्यात आल्यामुळे वाहनचालक व अतिक्रमणधारक यांच्यात वाढ होते. महामार्गावर किरकोळ अपघात झाल्यास वाहतूक विस्कळित होत असते. राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस पथक विस्कळित झालेली वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहनचालकांकडून वाहने थांबवून आर्थिक लूट केली जात असल्याचे सर्वत्र दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com