भाजप गाफील, "खाविआ', कॉंग्रेस सज्ज! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस अद्यापही अंधारात चाचपडत आहे. देशात व राज्यात सत्ता असलेली भाजप तर "युती' आणि "नेतृत्व' याच्या प्रतीक्षेत पूर्णपणे गाफील आहे, अशा परिस्थितीत पक्ष आणि उमेदवारांची दमछाक होणार हे निश्‍चित आहे. 

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस अद्यापही अंधारात चाचपडत आहे. देशात व राज्यात सत्ता असलेली भाजप तर "युती' आणि "नेतृत्व' याच्या प्रतीक्षेत पूर्णपणे गाफील आहे, अशा परिस्थितीत पक्ष आणि उमेदवारांची दमछाक होणार हे निश्‍चित आहे. 

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचे वारे गेल्या सहा महिन्यापासून वाहत आहेत. सप्टेंबर 21 ला विद्यमान नगरसेवकांची मुदत संपत असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती. मात्र आयोगाने आज अचानकपणे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून 1 ऑगस्ट मतदानाची तारीख निश्‍चित केली आहे. अशा स्थितीत पक्षनेतृत्वासह इच्छुकांच्या चेहरे प्रश्‍नांकित झाल्याचे दिसत आहे. 

भाजप युती, नेतृत्वाच्या गर्तेत 
निवडणूक नियोजनात भारतीय जनता पक्ष नेहमीच क्रमांक एक मानला जातो. परंतु जळगाव महापालिकेच्या बाबतीत सध्या तरी ते संपूर्णपणे उघडे पडल्याचे दिसत आहे. महापालिकेत भाजपचे सद्य:स्थितीत पंधरा नगरसेवक आहेत. प्रमुख विरोधी पक्ष आहे. तर केंद्रात व राज्यात सत्ता आहे. जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन आहेत. माजी मंत्री आणि गेल्या महापालिका निवडणुकांच्या नेतृत्वाचा अनुभव असलेले एकनाथ खडसे आहे. अशा स्थितीत भाजपची तयारी भक्कम हवी होती, आतापर्यंत उमेदवार जाहीर होण्याची गरज होती. परंतु भाजप तयारीत पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप-सेना युतीबाबत अद्यापही संभ्रम आहे. कार्यकर्ते युतीस तयार नाहीत, परंतु जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचे संकेत दिले आहेत. मात्र त्याबाबत ठामपणे निर्णय त्यांनी जाहीर केलेला नाही. दुसरीकडे गेल्यावेळी खडसे यांनी नेतृत्व केले होते. यावेळी कोण नेतृत्व करणार, अशी विचारणा कार्यकर्त्यांनी केली असता प्रदेश नेत्यांनी त्यांनाही कळविलेले नाही. त्यामुळे पक्षातील इच्छुक अद्यापही कुंपणावरच बसले असून तयारी करावी की नाही? असा प्रश्‍न त्यांच्या समोर आहे. एकंदरीत अद्यापही भाजप पूर्णपणे गाफील आहे. 

चाणाक्ष "खाविआ' सज्ज 
महापालिकेत सध्या सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडी सत्तेवर आहे. जैन हे शिवसेनेचेही नेते आहेत. अशा स्थितीत त्यांनी शिवसेना-भाजपची युती होईल, अशी घोषणा करून भाजपबाबत अद्यापही निर्णय प्रलंबित ठेवला. दुसरीकडे खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून तयारी सुरू केली, आज "खाविआ' तयारीत आघाडीवर आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज देण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे महापालिकेवर पुन्हा सत्तेच्या दिशेने आघाडीची वाटचाल असल्याचे हेच द्योतक आहे. 

कॉंग्रेसही जोमात 
महापालिकेत कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नाही, मात्र यावेळी पक्षाचे अस्तित्व दाखवायचे या तयारीने कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशच्या नेत्यांनीही तयारी सुरू केली आहे. पक्षाने यावेळी प्रथमच सर्वेक्षण केले, तर प्रदेशाध्यक्षांनी निवडणुकीसाठी प्रथमच बैठक घेतली. महापालिकेसाठी स्वतंत्रपणे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची नियुक्ती केली आहे. तर बुथरचनाही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सध्यातरी खानदेश विकास आघाडीनंतर कॉंग्रेसची तयारी आहे. 

राष्ट्रवादी, शिवसेना चाचपडतेय 
महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकरा नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. मात्र निवडणूक तयारीच्या बाबतीत दोन्ही पक्ष अद्यापही अंधारात चाचपडत असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे- पाटील यांनी बैठका घेतल्या. परंतु अद्यापही नेतृत्वाची जबाबदारी निश्‍चित केली नाही. बुथरचनेबाबत पक्षीय पातळीवर फारशी तयारी दिसून येत नाही. समविचारी पक्षांशी आघाडीची घोषणा केली, परंतु त्याबाबत चर्चेची एकही फेरी झालेली नाही. पक्ष महापालिकेत सध्या खानदेश विकास आघाडीच्या सोबत आहे. परंतु, युतीबाबत त्यांच्याशीही चर्चा झालेली नाही. मात्र आता पक्षातर्फे वेग देण्यात येण्याची शक्‍यता आहे. शिवसेनाही अद्याप अंधारातच आहे. शहरात माजी आमदार सुरेशदादा जैन यांचे नेतृत्व आहे. तसेच प्रदेश स्तरावरून जिल्हा संपर्कप्रमुख येथे येऊन गेले आहेत. त्यांनी दोन वेळा बैठकही घेतली आहे. परंतु सेनेची भाजप सोबत युती असल्याचे नेते जैन यांनी सांगितले. परंतु, अद्यापही त्याबाबत भूमिका स्पष्ट न झाल्यामुळे सेनेतर्फे इच्छुक असलेलेही काय करावे? या प्रश्‍नात आहेत. 

Web Title: marathi news jalgaon mahapalika election bjp