"घरकुल'पेक्षाही "वाघुर'ची व्याप्ती मोठी! 

"घरकुल'पेक्षाही "वाघुर'ची व्याप्ती मोठी! 

जळगाव : घरकुलप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयितांची नावे नसतानाही तत्कालीन तपासाधिकारी इशू सिंधू यांनी 52 जणांची नावे तपासात निष्पन्न करून त्यांना अटक केली होती. वाघुर घोटाळ्याची व्याप्ती घरकुलपेक्षाही अधिक असल्याचे मानले जाते. फिर्यादीत सुरेशदादा जैन यांच्यासह अनेकांची नावे आहेत. तरीही, या गुन्ह्यातील सहा वर्षांच्या तपासात तपासाधिकाऱ्यांनी मूळ फिर्यादीतील मुख्य व अन्य संशयितांना तर वगळलेच, शिवाय गुन्ह्यातील कलमंही वगळून टाकली. त्यामुळे या तपासाबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

दरम्यान, ज्यांनी फिर्याद दाखल केली ते नरेंद्र पाटील हयात नसून त्यांचे बंधू विजय पाटील यांनी तपासावर संशय व्यक्त करत उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागू, अशी भूमिका व्यक्त केली आहे. 

तत्कालीन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी 28 जुलै 2012ला शहर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत घरकुल घोटाळ्यातील बहुतांश संशयित वाघूरमध्येही अडकतील असे पुरावे तक्रारीसोबतच जोडले होते. तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह 1996 पासून ते 2006 पर्यंत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, महापौर व नगरसेवक पदावर असलेल्या सर्व जणांचा संशयितांमध्ये समावेश करण्यात आला होता. 

अशी होती योजना 
गिरणा धरणातील अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे वाघूर प्रकल्पावरून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. 1 एप्रिल 1996 ते 31 मार्च 2006 दरम्यान योजनेचे कामकाज चालले. आमदार सुरेशदादा जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, त्या-त्या वेळचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी तसेच भुसावळ येथील तापी प्रिस्ट्रेस्ड प्रा. लि. कंपनीचे संचालक व मालक यांनी योजनेच्या वेगवेगळ्या टप्प्यात बारा कोटी 78 हजार 852 रुपये 20 पैसे आणि 30 कोटी 61 लाख 90 हजार 209 मिळून 42 कोटी 62 लाख 69 हजार 61 रुपये 20 पैशांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणावरुन तक्रारीत नमूद करण्यात आले. 
 
तक्रारीतील कायदा व कलमे 
संशयितांनी नगरपालिकेसह जळगावकरांची फसवणूक केली म्हणून कलम- 420 लावण्यात आले होते. खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याचे भासवून उपयोगात आणणे (कलम-465,468,471) नियमांचे उल्लंघन (कलम-403,406) आर्थिक लाभासाठी लोकसेवकपदाचा दुरुपयोग (कलम-409), संगनमताने गुप्त कट (कलम-120 ब), संगनमत (कलम-34), लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम-13(1)(क),13(1) (ड),13(2) अपहार आदी कलमे तक्रारीत होती. 
 
तपासाअंती दोषारोप पत्रातील कलमे 
तपासाअंती दाखल दोषारोपात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाची सर्व कलमे वगळण्यात आली आहेत. तसेच अन्य कलमे वगळून कलम-420, 406,409, कलम-34 एवढीच कलमे नमूद आहेत. 
 
आता विजय पाटील फिर्यादी 
वाघूर गैरव्यवहारप्रकरणी नरेंद्र पाटील मूळ फिर्यादी होते. परंतु, त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू विजय पाटील व आरिफ शेख यांनी स्वतः: फिर्यादी होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला, त्यांची विनंती मंजूर होऊन आता या प्रकरणात ते दोन्ही फिर्यादी आहेत. 


राजकीय तडजोडी अन्‌ पोलिस मॅनेज 
राज्य शासनाच्या आदेशाने झालेल्या लेखापरीक्षण अहवालावरून अपहार उघडकीस आला. घरकुल घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा असताना केवळ राजकीय तडजोडी, आणि पोलिसांवर दबाव आणून मॅनेज करून मूळ फिर्यादीतील संशयितांची नावे वगळण्यात आली. सेशन कमिट कलमांचा तक्रारीत समावेश असताना, साध्या आर्थिक फसवणुकीच्या कलमान्वये पोलिसांनी चार्जशीट पाठविल्याने प्रामाणिकतेची अपेक्षा कोणाकडून करणार? या खटल्यात उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा करू. 
- ऍड. विजय पाटील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com