महावीर पतसंस्थेच्या संचालकांची मालमत्ता जप्त : एकनाथराव खडसे 

महावीर पतसंस्थेच्या संचालकांची मालमत्ता जप्त : एकनाथराव खडसे 

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे वसुलीसाठी सहकार न्यायालयाने महावीर अर्बन पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बॅंकेतर्फे ही कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती संचालक तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. 
पत्रकार परिषदेत श्री. खडसे यांनी सांगितले, की महावीर पतसंस्थेने जिल्हा बॅंकेकडून 2002 मध्ये आठ कोटी रुपये कर्ज घेतले आहे. त्यावेळी पतसंस्थेच्या संचालकांनी कर्जवसुलीचे हमीपत्र करून दिले आहे. जिल्हा बॅंकेने महावीर पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध 17 कोटी 58 लाख 33 हजार 83 रुपयांच्या कर्जवसुलीसाठी सहकार न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानुसार सहकार न्यायालयाने संचालक मंडळावर कर्ज व त्यावरील व्याज वसुलीची जबाबदारी ठेवली आहे. त्यानुसार महावीर पतसंस्थेचे संचालक मनीष ईश्‍वरलाल जैन, सुरेद्र नथमलजी लुंकड, सुभाष सागरमल सांखला, महेंद्र दुर्लभजी शहा, सुरेंद्र बन्सीलाल जैन, अजित बन्सीलाल कुचेरिया, तुळशीराम खंडू बारी, सपना अश्‍विन शहा, अपना अजय राका, सुरेशकुमार आनंदराज टाटिया यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. सहकार न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच जिल्हा बॅंकेतर्फे कारवाई सुरू करण्यात येणार आहे. 
 
धनादेश अनादरप्रकरणी संचालकांवर कारवाई 
महावीर पतसंस्थेने कर्जफेडीसाठी दिलेला धनादेश अनादर झाल्याप्रकरणी न्यायालयाने संचालकांना शिक्षा सुनावली असल्याची माहितीही श्री. खडसे यांनी दिली. याबाबत त्यांनी सांगितले, की पतसंस्थेने जिल्हा बॅंकेचे कर्ज भरण्यासाठी तीन कोटी व पाच कोटींचे धनादेश दिले होते. त्यावर मनीष ईश्‍वरलाल जैन, सुरेंद्र नथमलजी लुंकड, सुभाष सागरमल सांखला, विश्‍वनाथ रामसिंग पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे धनादेश अनादर झाल्याने जिल्हा बॅंकेतर्फे संबंधितांवर फौजदारी दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालात धनादेश अनादर प्रकरणी 11 कोटी रुपये कॉम्पेशेशन, पतसंस्थेला 25 हजार रुपये दंड व आरोपींना एक वर्ष साधी शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी आरोपींनी जिल्हा अपील दाखल केले आहे. त्यांनी 50 लाख रुपये कॉम्पेशेशन भरले. पुढील सुनावणी 9 व 10 मेस होणार आहे. 
 
महावीर पतसंस्थेने खोटा उतारा दिला 
महावीर पतसंस्थेने बोजा बसविलेला खोटा उतार दिल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची सुनावणी सुरू असल्याची माहिती श्री. खडसे यांनी दिली, ते म्हणाले, की पतसंस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीचे अवास्तव मूल्यांकन दिले. खोटा बोजा बसविलेला उतारा दिला. त्यामुळे जिल्हा बॅंकेने पतसंस्था व तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला असून, त्याची सुनावणी सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com