पथदिवे थकबाकीचा भार सोसवेना; जिल्ह्यात 196 कोटी थकीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

जळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला ग्रामपंचायतींकडून भरण्यात आला नाही. परिणामी "महावितरण'ची थकबाकी वाढत जाऊन 196 कोटीवर पोहचली आहे. पथदिव्यांच्या थकबाकीचा भार ग्रामपंचायतींवर वाढताच आहे. 

जळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला ग्रामपंचायतींकडून भरण्यात आला नाही. परिणामी "महावितरण'ची थकबाकी वाढत जाऊन 196 कोटीवर पोहचली आहे. पथदिव्यांच्या थकबाकीचा भार ग्रामपंचायतींवर वाढताच आहे. 

ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी दर महिन्याला वाढत आहे. थकबाकी न भरल्यास महावितरण वीजपुरवठा खंडित करू शकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधी, 14 वा वित्त आयोग किंवा इतर निधीतून थकबाकी भरण्याच्या स्पष्ट सूचना शासनाकडून आहेत. याबाबत ग्रामविकास विभागातर्फे फेब्रुवारी 2018 मध्ये राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र देण्यात आले आहेत. पथदिव्यांचे थकीत बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. ही गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकी भरण्याच्या सूचना पत्रात केल्या आहेत. 

196 कोटीची थकबाकी 
"महावितरण'च्या जळगाव परिमंडळात अर्थात खानदेशातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांपोटी पाच हजार 684 वीजजोडण्यांचे 481 कोटी 70 लाख रुपये थकीत आहेत. तर जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण दोन हजार 689 जोडण्या असून, त्यांच्याकडे जवळपास 186 कोटी 56 लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये पथदिव्यांच्या थकबाकी रकमेत सावदा विभाग आघाडीवर असून, ग्रामपंचायत पथदिव्यांच्या 317 वीजजोडण्यांचे 82 कोटी 66 लाख रुपये थकले आहेत. 

सहा महिन्यात 45 कोटी वाढले 
ग्रामपंचायतींकडे असलेल्या पथदिव्यांच्या थकबाकीची रक्‍कम भरण्यात ग्रामपंचायती पुढाकार घेत नाही. विशेष म्हणजे शासनाचे आदेश असताना देखील जिल्हा परिषद स्तरावरून हालचाली होत नाही. तर दुसरीकडे वाढत्या थकबाकीवर विराम लावण्यासाठी "महावितरण'कडून देखील वसुलीसाठी पुढाकार घेतला जात नाही. यामुळे थकबाकीची रक्‍कम वाढत आहे. कारण सहा महिन्यापूर्वी पथदिव्यांची थकबाकी 151 कोटी रुपयांची होती. यात 45 कोटी 52 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. 

जळगाव मंडळ 
विभाग...........पथदिवे जोडणी..........थकीत बिल 
- सावदा ...........317 ..........82 कोटी 66 लाख. 
- धरणगाव......... 730..........30 कोटी 14 लाख. 
- भुसावळ..........355...........20 कोटी 21 लाख. 
- पाचोरा........... 756.......... 25 कोटी 91 लाख. 
- मुक्ताईनगर.... ..212 ...........14 कोटी 24 लाख. 
- चाळीसगाव.......293............13 कोटी 76 लाख रुपये 
- जळगाव शहर.....225............11 कोटी 63 लाख 
- एकूण...........2,889.........196 कोटी 56 लाख रुपये 

Web Title: marathi news jalgaon mahavitaran bill pending street light