"महावितरण' अभियंत्यांचा भार होणार हलका! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

जळगाव ः वीजपुरवठा करताना ग्राहकांना सेवा देण्यासाठीची जबाबदारी उपविभागातील संबंधित अभियंत्यावर सोपविण्यात येते. यामुळे बऱ्याचदा तक्रारी सोडविणे किंवा थकबाकी वसुली वाढविण्याची कामे संथगतीने होतात. परंतु, यात तत्परता आणण्याच्या दृष्टीने उपअभियंत्यांचा भार हलका करून जबाबदारी विभागण्याचे नियोजन सुरू झाले आहे. 

जळगाव ः वीजपुरवठा करताना ग्राहकांना सेवा देण्यासाठीची जबाबदारी उपविभागातील संबंधित अभियंत्यावर सोपविण्यात येते. यामुळे बऱ्याचदा तक्रारी सोडविणे किंवा थकबाकी वसुली वाढविण्याची कामे संथगतीने होतात. परंतु, यात तत्परता आणण्याच्या दृष्टीने उपअभियंत्यांचा भार हलका करून जबाबदारी विभागण्याचे नियोजन सुरू झाले आहे. 

"महावितरण'कडून ग्राहकांना वीज पुरवठा करताना सेवेचा दर्जा सुधारण्याकडे पाऊल उचलत आहे. काही वर्षांपूर्वी केवळ जळगाव शहराचा विचार केल्यास संपूर्ण शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारी नोंदविणे आणि त्यांची दखल घेण्यासाठी एकाच कार्यालयावर जबाबदारी होती. परंतु, या जबाबदारीची विभागणी करून प्रत्येक परिसरात असलेल्या सबस्टेशनवर उपविभाग बनवून त्या- त्या भागातील कामाची जबाबदारी देण्यात आली. यामुळे नागरिकांच्या मुख्य कार्यालयात येऊन तक्रारी नोंदविणे आणि त्या सुटण्यासाठीची प्रतीक्षा काहीशी थांबली आहे. त्याच अनुषंगाने आता अभियंत्यावरील असलेली जबाबदारी विभागण्याचे नियोजन सुरू आहे. 

 
स्वतंत्र जबाबदारी 
"महावितरण'चे प्रत्येक भागानुसार असलेल्या उपविभागीय कार्यालयावर एक उपअभियंता नेमण्यात आलेला आहे. या एकट्या अभियंत्यावर वीज ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारी, दुरुस्तीचे काम आणि थकबाकी वसुलीची जबाबदारी देण्यात आली होती. यामुळे कामात पाहिजे तशी गती मिळत नव्हती. एक काम अडल्यास दुसऱ्या कामाचे नाव पुढे करून पडदा टाकला जात होता. परंतु, हेच काम आता सुरळीत करण्यासाठी उपअभियंत्यांवरील जबाबदारी विभागली जाणार आहे. म्हणजेच वसुली, दुरुस्ती आणि नागरिकांच्या तक्रारी सोडविणे यासाठीची स्वतंत्र जबाबदारी देऊन कर्मचारी नियुक्‍त केले जाणार आहेत. यामुळे अभियंत्यावरील भार हलका होऊन कामे लवकर होण्यास गती मिळणार आहे. 

 
रिडींगचे काम एजन्सीलाच! 
मीटर रीडिंग आणि बिल वाटपाचे काम "महावितरण'ने खासगी एजन्सीला दिले आहे. एजन्सीकडून होणारे काम समाधानकारक नसून, ग्राहकांच्या तक्रारी सुरू आहे. विशेष म्हणजे बिल वाटपाची समस्या अधिक असून ग्राहकांना बिल हे उशिराने मिळत असते. तरी देखील "महावितरण'कडून अजूनही हे काम एजन्सीकडेच ठेवले आहे. 

"उपविभागीय कार्यालयातील अभियंत्यांवर असलेली जबाबदारी विभागून त्याठिकाणी कर्मचारी नेमून वसुली, तक्रार निवारण आणि दुरुस्ती कामांबाबतची जबाबदारी सोपविण्याचे नियोजन सुरू आहे.' 
- दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता, महावितरण.

Web Title: marathi news jalgaon mahavitaran engineer