ठगबाजांबाबत अमेरिकेतून माहिती मागविणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

ठगबाजांबाबत अमेरिकेतून माहिती मागविणार 

ठगबाजांबाबत अमेरिकेतून माहिती मागविणार 

जळगाव : ऑनलाइन फसवणूक प्रकरणातील संशयित निशांत कोल्हेच्या संपर्कात देशभरातील विविध राज्यातील सायबर गुन्हेगारांची फेसबुक मॅसेंजरवरील ओळख असून, नेमके त्याचे खाते वापरणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासह गुन्ह्यातील पुरावे संकलनासाठी फेसबुकच्या अमेरिका येथील मुख्यालयाकडून माहिती मागवली जाणार आहे. 
बजाज फायनान्स कंपनीच्या औरंगाबाद विभागाच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात निशांत तेजकुमार कोल्हे (वय 18) याला शुक्रवारी (18 मे) अटक करण्यात आली होती. पहिल्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत सायबर तज्ज्ञांच्या मदतीने निशांतचे उपद्‌व्याप शोधून त्याच्या घरून संगणक संच, एक अश्‍लील साहित्याचे पार्सल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. बजाज फायनान्सच्या सायबर विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी संयुक्तरीत्या निशांतची विचारपूस केली. त्यानंतर प्रोफेशनल सायबर तज्ज्ञासमक्ष त्याच्याकडून माहिती संकलित करण्यात आली. निशांतच्या स्टेट बॅंक खात्यात 29 जुलै 17 ते 19 मे 2018 दरम्यान, 19 लाख 98 हजार 698 इतकी रक्कम जमा होऊन त्याने ती ऑनलाइन पद्धतीनेच खर्च केली आहे. 

ऑनलाइन ठगांची साखळी 
निशांतच्या संपर्कातील ऑनलाइन साखळीत जॉन बर्मन, ज्योतिर्मय सहारिया, वायदुरा फुकान (रा. गुवाहाटी), सनी वाघेला (हरियाना), अभिषेक कुमार (दिल्ली), पुष्पक राठोड (यवतमाळ), प्रणील राठोड (मुंबई) आदी हॅकर्स साखळीचा शोध घेतला जात असून, फेसबुकवर उलब्ध त्यांचे अकाऊंट नेमके कोण ऑपरेट करतोय याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून, निशांतच्या संपर्कातील ही सर्व मंडळी फेसबूक मॅसेंजरवरील नावानेच ओळखली जाते, त्याचे खाते कोठून व कोण, कसे वापरतो याची माहिती सायबर तज्ज्ञाद्वारे मागविली जाणार आहे. 

काय व कशा प्रकारचा गुन्हा 
निशांत व त्याच्या संपर्कातील टोळीने ऑनलाइन पेमेंट पद्धतीच्या पे-टीएमची "फेक की' तयार केली असून, दोनशे क्रेडिट कार्डची डिटेल्स माहिती, 60 हजार ई-एमआय कार्डच्या डिटेल्सची सॉफ्ट कॉपी माहिती त्याच्याकडे उपलब्ध आहे. त्या माहितीच्या आधारेच कार्डधारकाच्या नावे ऑनलाइन शॉपीमधून खरेदीचा सपाटा लावला होता. 
--------------------- 
 

Web Title: marathi news jalgaon mahitil