बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर चढविणार बोजा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

जळगाव ः ज्या मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या मालमत्ताकराची रक्कम वर्षभरापासून थकविली आहे अशा बड्या थकबाकीदारांच्या नावांच्या याद्यांचे बॅनर प्रत्येक चौका-चौकात लावले जाणार आहे. तसेच बड्या थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी चार दिवसांची मुदत दिली जाणार असून, ही रक्कम न भरल्यास थकबाकीदारांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. 

महापालिका प्रशासनातर्फे 31 डिसेंबर 2018 अखेर रकमेचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना 3 टक्के सूट देण्यात आली आहे. डिसेंबर 2018 अखेर कराचा भरणा न करणाऱ्या मिळकतधारकांना जप्ती वॉरंट बजावण्याचे काम प्रभाग कार्यालयामार्फत सुरू असून मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीसंबंधी कायदेशीर कारवाई करण्याबाबत आयुक्तांनी बैठकीत आदेश दिले. 13 जानेवारीपासून शहरात वसुली केली जाणार आहे. तसेच शासनाकडून आयुक्तांना त्यांची कामगिरी सुधारण्याच्या सूचना दिल्या असून, 90 टक्के वसुली करणे बंधनकारक केल्याने आयुक्तांनी वसुली मोहीम राबविणे सुरू केले आहे. 

जप्ती वॉरंट बजावणार 
थकलेला मालमत्ताकर वसुलीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्ताधारक थकबाकी भरत नाहीत अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेची जप्ती नोटिसा महापालिका बजावणार आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात थकबाकीदारांवर कारवाईचे उद्दिष्ट दिले जाणार असून, मालमत्तेचा लिलाव केला जाईल. 

थकबाकी भरण्यासाठी चार दिवसांची मुदत 
मालमत्ताधारकांनी चार दिवसांची थकबाकी भरण्याची महापालिका मुदत देणार आहे. मुदतीत रक्कम भरणा न केल्यास मिळकतपत्रिका व सातबारा उताऱ्यावर महापालिका थकबाकी रक्कमेचा बोजा लावण्याबाबत तहसीलदार व नगर भूमापन विभागास अहवाल सादर केला जाईल. 

कर भरला तरच नळजोडणी 
अमृत योजनेंतर्गत नळ संयोजन नव्याने देण्याचे काम सुरू केला जाणार आहे. त्यामुळे थकीत मालमत्ताकर व पाणीपट्टी कराच्या रक्कम भरल्याशिवाय नळसंयोजन न देण्याची सूचना दिलेली आहे. तसेच अनधिकृत नळसंयोजनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. 

आठ निलंबित कर्मचारी सेवेत 
तत्कालीन आयुक्तांनी "मनपा'तील 51 कर्मचाऱ्यांना उशिरा येणे, उर्मट वागणूक करणे, गैरहजर राहणे आदी कारणांमुळे निलंबित केले होते. त्यापैकी 28 जणांना कामावर घेण्यात आले आहे. आता पुन्हा आठ कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले आहे. 

Web Title: marathi news jalgaon malmatta tax pending