माणुसकी जपली : बेशुद्ध व्यक्तीस रुग्णालयात   

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

जळगाव ः नागपूर येथील एक ज्येष्ठ नागरिक दुपारी मेहरूण तलावाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यास बांधकाम व्यावसायिक विलास यशवंते, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, पंकज सपकाळे यांनी अगोदर पोलिस ठाण्यात, नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या कृतीतून माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला. 

माजी नगरसेवक शिरसाळे मेहरुण परिसरात त्यांच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी दुपारी गेले. त्यावेळी त्यांना एक गृहस्थ बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेला दिसला. त्याला त्यांनी उठविले असता ते काहीच बोलत नव्हते. बोलले तर असंबंध बडबड करीत होते. यामुळे शिरसाळे यांनी विलास यशंवते, सपकाळे आदी मित्रांना बोलावून या व्यक्तीस एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. तेथे हकिगत सांगून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्याकडे असलेल्या मतदान ओळखपत्रावरून ते गृहस्थ नागपूर येथील रामबाग भागातील भालचंद्र बळिराम मेश्राम असल्याचे स्पष्ट झाले. श्री. यशवंते यांनी नागपूरच्या त्यांच्या मित्राला माहिती देऊन संबंधितांच्या घरी जाऊन माहिती देण्यास सांगितले. तो मित्र तेथे गेला. मात्र, त्यांचे कुटुंबीय नाशिकला गेल्याचे समजले. त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवून श्री. यशवंते यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. सायंकाळी कुटुंबीय नाशिकवरून जळगावला येणार होते. डॉक्‍टरांनी मेश्राम यांच्यावर उपचार केले. सायंकाळपर्यंत श्री. यशवंते यांच्यासह त्यांचे मित्र जिल्हा रुग्णालयात थांबून होते. माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon man hospital yashvante three friend