"कोरोना'चे रुग्ण वाढताना "डीन' बदल्यांचा घोळ 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

कोल्हापुरातही "लॉकडाउन' असल्याने बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणारी पास जमा करण्यास वेळ लागेल. त्यामुळे सोमवारपर्यंत (25 मे) नव्याने बदली झालेल्या ठिकाणी रुजू होऊ. 
- डॉ. मीनाक्षी गजभिये, नियुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता.

जळगाव : देशातील सर्वाधिक रुग्ण राज्यात असल्याने राज्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे. यातच खानदेशातही "कोरोना'रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, दुसरीकडे वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांच्या बदल्यांचा घोळ सुरू आहे. जळगावच्या नवीन "डीन' म्हणून डॉ. मीनाक्षी जगभिये यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले. परंतु त्या पदभार स्वीकारण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

क्‍लिक करा - धक्‍कादायक : जिल्ह्यात 26 कोरोनाचे नवीन रूग्ण 

देशात "कोरोना'ची सर्वाधिक रुग्णसंख्या आपल्या राज्यात आहे. दररोज "कोरोना'च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातही महिनाभरात "कोरोना'चे 382 रुग्ण आढळून आले असल्याने मालेगावनंतर सर्वाधिक रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले आहेत. यातच जिल्ह्यात "कोरोना'मुळे मृत्यूची संख्याही सर्वाधिक असल्याने जळगावातील मृत्यूदराबाबत राज्य सरकाने दखल घेतली आहे. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक व "डीन' यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा सर्वाधिक असल्याचे पालकमंत्र्यांच्या बैठकीत समोर आले. एकीकडे "कोरोना'चे भीषण संकट असताना दुसरीकडे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या जागी कोल्हापूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या बदलीचे आदेश काल सायंकाळी आले. परंतु डॉ. गजभिये हे बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याबाबत इच्छुक नसल्याने वरिष्ठ स्तरावरून त्यांची बदली इतर होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. 

जळगावसारखीच स्थिती कोल्हापुरात 
ज्याप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांच्यात समन्वय नसल्याने त्यांच्यात अनेकदा वाद झाले. हीच स्थिती कोल्हापूर वैद्यकीय महाविद्यालयात आहे. या ठिकाणीही शल्यचिकित्सक व "डीन' यांच्यात वाद सुरू असल्याने डॉ. मीनाक्षी गजभिये यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे. 

नियुक्त "डीन' जळगावच्या बदलीबाबत संभ्रम 
नियुक्त "डीन' डॉ. गजभिये या नागपूर येथील असून, गेल्या तीन वर्षांपूर्वी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्त होत्या. त्यानंतर सात महिन्यांपूर्वी त्यांची बदली कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली. सात महिन्यांनंतर आता पुन्हा त्यांची बदली जळगावात झाली. मात्र डॉ. गजभिये या जळगावातील बदलीबाबत इच्छुक नसून त्यांना इतर ठिकाणी बदली हवी असल्याने त्यांच्या नियुक्तीबाबत अद्याप संभ्रम आहे. 

 

बदली आदेश दुरुस्त होण्याच्या मार्गावर 
काल सायंकाळी जळगाव, धुळे व कोल्हापूर अधिष्ठातांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. यात जळगावच्या "डीन' म्हणून डॉ. मीनाक्षी गजभिये यांची नियुक्ती केली. मात्र, वरिष्ठ स्तरावर अजूनही हा बदलीचा आदेश दुरुस्त होण्याच्या मार्गावर असल्याने डॉ. गजभिये यांच्या नियुक्तीत आणखी बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon medical collage dean transfer corona virus piread