मेहरुण तलावात बुडून दोघा भावंडांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

जळगाव ः शहरातील अक्‍सानगरातील तीन भावंडे आज सायंकाळी फिरायला गेली होती. या तिघांपैकी दोन सख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला; तर तिसऱ्या भावाला पाण्यातून काढण्यात यश आल्याने तो बचावला. दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. 
मोहम्मद उमेर जकी अहमद (वय 10), अबुलैस जकी अहमद (वय 16) अशी मृतांची नावे आहेत; तर अनसला वाचविण्यात परिसरातील पोहणाऱ्यांना यश आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळला असून, तलावावर सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी होत आहे. 

अशी घडली घटना 
याबाबत नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी, की अनस जकी अहमद, मोहम्मद उमेर जकी अहमद, अबुलैस जकी अहमद ही भावंडे आज दुपारी मेहरुण तलावाजवळ दुचाकीवरून फिरण्यासाठी गेले होते. मेहरुण तलावाजवळ काही वेळ फिरल्यानंतर त्यांनी आपली दुचाकी त्या ठिकाणी लावून ते पाण्यात उतरले. पाण्यात उतरल्यानंतर मोहम्मद उमेर यास पाण्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय निसटला आणि तो बुडू लागला. याचवेळी त्यासोबत असलेला त्याचा भाऊ अबुलैस व अनस हे त्याला वाचविण्यासाठी गेले. परंतु तेही बुडू लागल्याने अनसने जोरात आरडाओरड करण्यास सुरवात केली. 

तिसऱ्याला वाचविले 
दरम्यान, त्या ठिकाणी असलेले परवेज अख्तर, साबिरोद्दीन पिरजादे व बबलू पिरजादे यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत अनसला वाचविले. यानंतर बुडालेल्या दोघा भावंडांना काढून त्यांना तत्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता दोघा भावंडांना मृत घोषित केले. 

खड्ड्याचा अंदाज न आल्याने मृत्यू 
मेहरुण तलावात काठालगतच मोठमोठे खड्‌डे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हे खड्डे पूर्णपणे भरलेले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे मोहम्मद उमेर व अबुलैस यांचा मृत्यू झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. 

नातेवाइकांचा आक्रोश 
मृत मुलांचे वडील जकी अहमद हे जामनेर तालुक्‍यातील पहूरपेठ येथील जि. प. उर्दू शाळेत शिक्षक आहेत. आपल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाइकांसह त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मुलांचे मृतदेह पाहताच त्यांनी टाहो फोडला, तर अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले. 

सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी 
एकाच कुटुंबातील दोघा भावंडांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाइकांसह मित्रमंडळींनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तलावाजवळ पोहता येणाऱ्या सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी; अन्यथा तलावात भर टाकून तो बुजवावा, अशी मागणी संतप्त झालेले अनिस शेख अकबर यांनी केली. याबाबत आयुक्तांनाही निवेदन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या आधीही अशा अनेक घटना घडल्या असून, तलावास कुंपण करण्याची मागणीही झाली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याकडे कधीही लक्ष दिलेले नाही, अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mehrun talav 2 brother daith