
प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून नाताळचा दिवस पाळला जातो. ख्रिस्त जयंती व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. शहरात मेमोरिअल अलायन्स चर्च, सेंट थॉमस चर्च यांसह शहरासह परिसरात चर्च असून, यामधून नाताळच्या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत.
जळगाव : नाताळ सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. ख्रिस्ती समाजबांधवांना नाताळचे (ख्रिसमस) वेध लागले असून, 25 डिसेंबरला सण साजरा होणार आहे. उत्सवात ख्रिस्ती बांधव एकमेकांना भेटवस्तू देऊन आनंद साजरा करतात. पाच दिवसांवर ख्रिसमस असला तरी ख्रिश्चन बांधवांच्या घरोघरी सांताक्लॉज आमंत्रण देण्यासाठी पोहचू लागले आहे.
प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून नाताळचा दिवस पाळला जातो. ख्रिस्त जयंती व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. शहरात मेमोरिअल अलायन्स चर्च, सेंट थॉमस चर्च यांसह शहरासह परिसरात चर्च असून, यामधून नाताळच्या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत. ख्रिसमसच्या पाच दिवस आधीपासूनच उत्सवाला सुरवात झाली आहे. त्यामुळे ख्रिस्ती समाजबांधवांनी नाताळची खरेदीही सुरू केली आहे. यामुळे बाजारात लगबग वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चर्चमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची तयारी सुरू करण्यात आली आहे.
नाताळात उत्साह द्विगुणित
ख्रिसमस सण बुधवारी (ता. 25) साजरा करण्यात येणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. 24) रात्री चर्चच्या अंगणात ख्रिस्ती बांधव रंगीबेरंगी पोशाख करून एकत्र जमतात. चर्चमध्ये प्रार्थना करतात. चर्चवर आकर्षक रोषणाई केली जाते. ख्रिस्ती बांधव घरांची रंगरंगोटी, रोषणाई, मेणबत्त्या तेवत ठेवून आनंदाने हा सण साजरा करतात. नाताळनिमित्ताने नवीन कपड्यांची खरेदी होते. एकमेकांना नाताळच्या शुभेच्छांबरोबरच भेटवस्तूही दिल्या जातात. उत्सवात केक तयार करण्याची प्रथा आहे. घरात पणत्या, आकाशदिवे लावणे, ख्रिस्ती भक्तिपर गाणी म्हणणे, ख्रिसमस ट्री तयार करणे यांसह विविध प्रकारची सजावटही नाताळात केली जाते.
घरोघरी नाच गाणे सुरू
नाताळनिमित्त कुटुंबीयांत नात्याचे रेशमी बंध जपले जातात. नाताळच्या आधी पाच दिवस ख्रिस्तावरची गाणी गायली जातात. यास सुरवात झाली आहे. नाताळच्या सणाने नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल सुरू झाली आहे. नववर्षाच्या स्वागताच्या तयारीचे वेध आतापासूनच लागले आहेत. शिवाय सांताक्लॉज व फादर घरोघरी जाऊन आमंत्रण देत आहेत. सांताक्लॉज नाचून आमंत्रण देत आहे.
आमंत्रण देण्यास सुरवात
ख्रिसमस निमित्ताने चर्चमध्ये कार्यक्रम होणार आहे. यात प्रामुख्याने ख्रिसमसच्या दिवशी प्रभू येशू समोर प्रार्थना करण्यात येणार आहे. चर्चमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांसाठी घरोघरी जाऊन आमंत्रण देण्यास सुरवात झाली आहे. सांताक्लॉजचा वेश करून प्रत्येक ख्रिस्ती बांधवाच्या घरी जाऊन गाणे म्हणत आनंदोत्सव साजरा केला जातोय. यामुळे आतापासूनच ख्रिसमस साजरा करण्यास सुरवात झाली आहे.