काम सुधारा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू; आमदार भोळेंचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

जळगाव : किरकोळ कामासाठीही सर्वसामान्यांना वेठीस धरत फेऱ्या मारायला लावणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयात आज दुपारी आमदार सुरेश भोळेंचा रुद्रावतार बघायला मिळाला. पैसे घेऊनही वर्षानुवर्षे कामे होत नाहीत म्हणून नागरिक त्रस्त झाले आहेत, हे चित्र बदलून कामात सुधारणा करा. अन्यथा, आठवड्यानंतर याच कार्यालयात येऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा संतप्त इशारा आमदार सुरेश भोळेंनी दिला. 

जळगाव : किरकोळ कामासाठीही सर्वसामान्यांना वेठीस धरत फेऱ्या मारायला लावणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयात आज दुपारी आमदार सुरेश भोळेंचा रुद्रावतार बघायला मिळाला. पैसे घेऊनही वर्षानुवर्षे कामे होत नाहीत म्हणून नागरिक त्रस्त झाले आहेत, हे चित्र बदलून कामात सुधारणा करा. अन्यथा, आठवड्यानंतर याच कार्यालयात येऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा संतप्त इशारा आमदार सुरेश भोळेंनी दिला. 
एरवी संयमी व विनम्र असलेल्या आमदार सुरेश भोळे आज भूमिअभिलेख कार्यालयात चक्क संतप्त भावना व्यक्त करताना दिसले. नगरभूमापन आणि भूमिअभिलेख कार्यालये ही सर्वसामान्यांच्या मालमत्तांची नोंदणी ठेवणारी कार्यालये आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना या कार्यालयांशी कोणत्या न कोणत्या संबंधात काम पडते. मात्र, या दोन्ही कार्यालयांमधील बेशिस्त, अधिकारी- कर्मचाऱ्यांची मनमानी आणि कथित गैरव्यवहार यामुळे सामान्य नागरिक वेठीस धरले जातात. किरकोळ कामासाठीही नागरिकांना अनेक चकरा माराव्या लागतात. अनेकदा वारंवार येऊन, पैसे देऊनही कामे होत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. 

आमदारांकडे गाऱ्हाणे 
वीजमीटर, नळकनेक्‍शन यासारख्या कामांसाठी मालमत्ता नोंदीची कागदपत्रे आवश्‍यक असतात. मात्र, बऱ्याचदा प्रक्रिया पूर्ण करूनही ती मिळत नाहीत. अनेक प्रकरणाची सुनावणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जाते. यासारख्या अनेक तक्रारी नागरिकांनी आमदार भोळेंकडे केल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी भोळेंनी भूमिअभिलेख कार्यालयात जाऊन अधीक्षक, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. 

रुद्रावताराने सारेच थक्क 
भोळेंच्या या पवित्र्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना झापले होते. त्यानंतरही भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाज सुधारले नाही. अखेरीस गुरुवारी दुपारी साडेअकरा- बाराच्या सुमारास आमदार भोळे भूमिअभिलेख कार्यालयात गेले, कुणी या तक्रारी गांभीर्याने घेत नाही म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. नागरिकांना वेठीस धरण्याच्या या कामकाजात सुधारणा झाली नाही तर, आठवडाभराने येतो.. आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच काळे फासतो, असा इशारा त्यांनी दिला. आमदारांच्या या पवित्र्यामुळे अधीक्षकांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे समजते. 

भूमिअभिलेख कार्यालयातील अनागोंदीबाबत अनेक तक्रारी आहेत. पैसे घेऊनही अधिकारी नागरिकांची कामे करीत नाहीत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, त्यामुळेच आज संतप्त होऊन कामकाजात सुधारणा करण्याची सूचना देऊन आलोय. 
- सुरेश भोळे, आमदार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mla bhole bhumiabhi lekh office