शिक्षक भरतीचे रॅकेट उघड करणार : आमदार किशोर पाटील

kishor patil
kishor patil

पाचोरा : पाचोरा व भडगाव तालुक्यासह जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांनी बनावट विद्यार्थी पटसंख्या दाखवून त्याआधारे शिक्षकांची शालार्थ ‘आयडी’ मिळवून बेरोजगार युवकांकडून लाखो रुपये लाटले आहेत. हे रॅकेट आपण उघड केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला आहे. 
या संदर्भात ‘शिवतीर्थ’ या शिवसेना कार्यालयात आज सायंकाळी आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अॅड. दिनकर देवरे, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते. आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले, की आपण आजपर्यंत आपल्या राजकीय जीवनात कोणत्याही शिक्षण संस्थेसंदर्भात आरोपात्मक विधाने अथवा कोणतीही कृती केलेली नाही. मात्र, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे शिक्षण संस्थेतील बोगस विद्यार्थी पटसंख्या व त्या आधारे शिक्षक भरती या प्रकरणात मोठा घोटाळा झालेला आहे. त्याआधारे शिक्षण संस्थाचालकांनी लाखो रुपये लाटले आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर मी या गंभीर विषयाकडे लक्ष घातले असून २०१२ नंतर शिक्षण संस्थाचालकांना शिक्षकाची नोकरी देण्याचा अधिकार राहिलेला नाही. जळगाव जिल्ह्याचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. महाजन यांनी ५ नोव्हेंबरला शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यात म्हटले आहे, की १३ ऑगस्ट २०१५ ते ३१ मे २०१९ या कालावधीत जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होतो. त्यानंतर शिक्षणाधिकारी मनपा नाशिक येथे बदली झाली. असे असताना उपरोक्त कालावधीतील काही संस्थांनी चुकीच्या पद्धतीने २०१५-१६ च्या संच मान्यतेतील शिक्षकांची प्रस्तावित पदे मंजूर शिक्षक पदांमध्ये टाकून नवीन संच मान्यता प्राप्त केल्या. या पदांवर कर्मचारी नेमणूक करून माझ्या स्वाक्षरीचा स्कॅन करून सदरचा प्रस्ताव शालार्थसाठी आपल्या कार्यालयात पाठविला. या संस्थांची सखोल चौकशी करून कार्यवाही व्हावी. 


सहा शिक्षकांना आयडी 
या आधारे आमदार किशोर पाटील यांनी शिक्षण उपसंचालक नाशिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात भेट देऊन याबाबत माहिती मिळवली असता, या कार्यालयातून काही प्रस्ताव गायब करण्यात आल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांची बनावट पटसंख्या त्या आधारे शिक्षकांची मान्यता, बनावट कागदपत्रे तयार करून शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव दाखल करून सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना नेमणुका दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पाचोरा येथील एका विद्यालयातील सहा शिक्षकांना शालार्थ आयडी मिळवण्यात संस्थाचालक यशस्वी झाल्याचे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले. शालार्थ आयडी मिळवण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांचा ठराव, त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्याला मान्यता, पुरेशी विद्यार्थी पटसंख्या अशी प्रक्रिया आहे. याप्रकरणी अशी कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याचे उघड झाले आहे. 

बेरोजगारांना आवाहन 
बेरोजगार तरुणांनी संस्थाचालकांना लाखो रुपये देऊन उगीच यात अडकू नये, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले. बहुतांश संस्थाचालकांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात अर्थपूर्ण व्यवहार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासनास फसवणुकीचा प्रकार केलेला आहे. संबंधित शिक्षकांकडून लाखो रुपये घेण्यात आले आहेत. तसेच २०१२ पासून ते ऑक्टोबर २०१९ पर्यंतची पगाराच्या फरकाची रक्कम देखील संस्थाचालक घेणार आहेत. बोगस विद्यार्थी पटसंख्या व त्या आधारे बोगस शिक्षकांची भरतीचे हे रॅकेट जिल्ह्यासह राज्यभर असून हे रॅकेट उघड केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अपंग युनिट संदर्भातही सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांना भेटणार 
शिक्षण संस्थांमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणी विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवण्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ही संपूर्ण भ्रष्टाचाराची प्रक्रिया त्यांच्यापुढे मांडणार आहे. संबंधित विभागाच्या सचिवांसह मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी आग्रह धरणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले. माजी शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे केलेल्या तक्रारीची सत्य प्रतही त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. अॅड. दिनकर देवरे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com