मोदी सरकार आल्याचा आनंद ; शेवभाजीचे दोन हजार पार्सल अन्‌ तीन क्‍विंटलचा नाश्‍ता वाटप! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

जळगाव ः लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील "हॉटेल भूमी'चे हरीश कोल्हे यांनी आज शेवभाजीचे दोन हजार पार्सल मोफत वाटप केले; तर रथ चौकातील भजी विक्रेत्याने सकाळी भजीचा नाश्‍ता मोफत वाटप केला. 

जळगाव ः लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील "हॉटेल भूमी'चे हरीश कोल्हे यांनी आज शेवभाजीचे दोन हजार पार्सल मोफत वाटप केले; तर रथ चौकातील भजी विक्रेत्याने सकाळी भजीचा नाश्‍ता मोफत वाटप केला. 

लोकसभा निवडणूक लागल्यापासून अनेक जण पुन्हा मोदी सरकार येणार की परिवर्तन होणार, याचे तर्कवितर्क लावत होते. इतकेच नाही; तर मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतरही देशात मोदी सरकार आले, तरी स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्‍त केला जात होता; परंतु काल (23 मे) सर्व चित्र स्पष्ट झाले असून, देशात पुन्हा एकदा "नमो..नमो..'चा डंका राहिला. मात्र, निकाल लागण्यापूर्वी लावण्यात येणाऱ्या तर्कवितर्कांत मोदी सरकारच यावे, अशी इच्छा अनेकांकडून व्यक्‍त केली जात होती. इतकेच नाही; तर अनेक जण "पैजा' लावत होते. अशाच प्रकारे 23 मेच्या निकालात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यास मोफत नाश्‍तावाटप आणि जेवणाचे पार्सलवाटप करण्याचे यापूर्वीच शहरातून दोघांनी जाहीर केले होते. तसे पोस्टरदेखील लावले होते. 

शेवभाजी घेण्यासाठी लागली रांग 
कालिंकामाता मंदिराजवळ महामार्गावरील "हॉटेल भूमी'चे मालक हरीश कोल्हे यांनी पंधरा दिवसांपूर्वी मोदी सरकार आल्यास मोफत पार्सलवाटपचे बॅनर लावले होते. त्यानुसार देशात मोदींची सत्ता बसल्यानंतर आज कोल्हे यांनी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत पार्सलवाटप केले. यासाठी साधारण 90 ते 100 किलो शेव मागवून त्याची भाजी तयार करण्यात आली होती. या भाजीचे पार्सल साधारण दोन हजार नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. पार्सल घेण्यासाठी नागरिकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यासाठी जुने जळगाव बहुद्देशीय मित्रमंडळाच्या शंभर ते सव्वाशे जणांचे पथक मदतीसाठी उपस्थित होते. 

तीन क्‍विंटलचा नाश्‍ता वाटप 
रथ चौक परिसरातील मधू कोळी व भूषण सोनवणे यांचे नाश्‍त्याचे दुकान आहे. मोदी सरकार आल्यास मोफत नाश्‍ता देण्याचा मनोदय व्यक्‍त केला होता. त्यानुसार मोदी सरकार आल्याने आज सकाळी सातपासून मोफत नाश्‍ता देण्यास सुरवात केली. सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत नाश्‍त्याची गाडी सुरू ठेवून येणाऱ्यांना पोटभर नाश्‍ता देण्यात आला. नाश्‍त्यामध्ये पालक भजी, कांदा भजी, पाववडे आणि खमंग (30 किलो) असा नाश्‍ता ठेवण्यात आला होता. यामध्ये तीन क्‍विंटलचा नाश्‍तावाटप करण्यात आला. यासाठी दोन क्‍विंटल पालक, दोन गोणी कांदा व 80 किलो तेल लागले. यासाठी मधू सोनवणे, भूषण सोनवणे, गणेश सोनवणे, राहुल कोळी, भुरा कोळी, भारत कोळी, रवी कोळी, विनोद सोनवणे, समाधान कोळी, अजय कोळी व गोकुळ कोळी यांचे सहकार्य होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon modi sarkar free lunch scnak package