दोन मुले तरीही झाली निराधार...शेवटी हिनेच दिला आधार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

मोठा मुलगा मदन व लहान मोहन पाटील तसेच सूना नातवंड आहेत. माझ्याकडे शेती आहे. मुलांनी मला घराबाहेर काढल्याचे तिने सांगितले. कमलाकर पाटील, पंकज पाटील यांनी लोहारखेडा येथे संपर्क साधून, वृद्ध महिलेची माहिती मिळवली.

सावदा : लोहारखेडा (ता. मुक्ताईनगर) येथील वृद्ध महिला बेघर झाल्याने भटकंती करीत सावदा येथे पोहचली. सामाजिक कार्यकर्त्यांनी तिची विचारपूस केली असता मुले वागवत नसल्याचे उघड झाले. अखेर मुलीने आईला सांभाळण्याची जबाबदारी घेतली. पोलिसांनी या वृद्ध मातेला मुलगी व जावायाच्या स्वाधीन केले. 

सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील व पंकज पाटील यांना एका हॉटेलजवळ वयोवृद्ध महिला दिसली. तिची चौकशी केली असता तिने मथुराबाई देवराम पाटील (रा. लोहारखेडा, ता. मुक्ताईनगर) असे नाव असल्याचे सांगितले. मोठा मुलगा मदन व लहान मोहन पाटील तसेच सूना नातवंड आहेत. माझ्याकडे शेती आहे. मुलांनी मला घराबाहेर काढल्याचे तिने सांगितले. कमलाकर पाटील, पंकज पाटील यांनी लोहारखेडा येथे संपर्क साधून, वृद्ध महिलेची माहिती मिळवली. गावातील काही ज्येष्ठ नागरिकांनी वृद्ध महिलेच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलांनी वागविण्याबाबत स्पष्ट नकार दिला. हे ऐकूण वृद्ध माता रडायला लागल्या. यानंतर आमदार चंद्रकांत पाटील व सावदा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना माहिती दिली. 

हेही पहा > उसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे

वृद्धाश्रमात पाठविण्याचा झाला निर्णय
पोलिसांनी लोहारखेडा येथील पोलिसपाटील मार्फत दोघे मुलांकडे तुमच्या आईला घेऊन जा, असा निरोप पाठविला. मात्र पोलिसांनाही दोघं मुलांनी नकार दिला. यानंतर वृद्ध मातेला जळगाव येथे वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्या मातेने मुलीकडे मोहराळा (ता. यावल) येथे सोडून देण्याची विनंती केली. मुलगी व जावयाने या वृद्ध मातेला सांभाळण्यास होकार दिला. हवालदार संजय चौधरी, सपकाळे व गृहरक्षक दलाच्या कांचन पाटील यांनी पोलिस गाडीत या मातेला मुलीच्या घरी सोडले. मुलीची भेट होताच वृद्ध मातेला हायसे वाटले. या घटनेतून मात्र आयुष्याच्या शेवटी मुलगीच कामा आल्याचे दिसून आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mother no house two child