"मनपा'चे तत्कालीन उपायुक्त पठाणकडून विधवेवर अत्याचार 

residentional photo
residentional photo

जळगाव ः येथील महापालिकेत उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पदावर काम केलेले वरिष्ठ अधिकारी साजीद पठाण यांच्याविरुद्ध पस्तीसवर्षीय विधवेने बलात्काराची तक्रार दिली. त्यावरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. जळगावात कार्यरत असताना वादग्रस्त कारकिर्दीचे धनी असलेल्या पठाण साहेबांनी विधवेला सरकारी नोकरी आणि दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवत तब्बल चार वर्षे अनन्वीत अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले असून, त्यांना मदत करणारा एक अभियंता व दुसऱ्या डॉक्‍टरविरुद्धही शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. 
पीडिता बेगमबाई पठाण (वय 35, काल्पनिक नाव) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार तिच्या पतीचा 2002 मध्ये मृत्यू झाल्याने त्या मुलासह जळगावात (माहेर) राहण्यासाठी आल्या. स्थानिक वृत्तपत्रांत महापालिकेतर्फे विधवा, निराधार महिलांना घरकुल वाटप करण्यात येत असल्याची जाहिरात आल्याचे कानावर आल्याने त्या 2011 मध्ये नावनोंदणीसाठी निवेदन घेऊन इतर महिलांसह महापालिकेत आल्या होत्या. तत्कालीन उपायुक्त साजीद अमानुल्ला खान पठाण (वय 50) यांना निवेदन देतेवेळी ओळख होऊन त्यांनी बेगमबाईंना महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन देत मोबाईल नंबर घेऊन नंतर भेटण्याचे सांगितले होते. त्यानंतर मोबाईलवर वांरवार संपर्क होऊन 2012 मध्ये एकदा साजीद पठाण याने नोकरीचे कारण सांगून इंडिया गॅरेजच्या गल्लीत अभियंता शंभू सोनवणे यांच्या घरी बोलावले. तेथे बळजबरी अत्याचार करून विरोध केल्याने महिनाभरात लग्न करण्याचे आमिषही दिले, तसेच लग्नाचे नाव करून एकदा शासकीय वाहनातून औरंगाबादकडे घेऊन गेला. अजिंठा घाटात वाहन असताना कार्यालयातून फोन आल्याने त्याने वाहन मागे वळवले. नंतर एका निर्जनस्थळी नेत अत्याचार केले. तेव्हापासून सलग चार वर्षे कधी नोकरीचे कारण सांगून, कधी लग्न करतो, असे सांगून अत्याचार केला. लग्नाचा हट्ट धरल्यावर मात्र उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर मुंबईत मंत्रालयात बदली झाल्याने त्याने संपर्क तोडून लग्नास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक करून शोषण केल्याने तक्रार देण्यासाठी आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अत्याचार करण्यासाठी साजीद पठाणला मदत करणारे अभियंता शंभू सोनवणे यांच्या घरात व डॉ. राजेश पाटील यांच्या रुग्णालयात अत्याचार करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटल्याने साजीद पठाणविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंभू सोनवणे व डॉ. राजेश पाटील यांना दाखल गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. सहाय्यक निरीक्षक सारिका कोडापे तपास करीत आहेत. 

 
दबावतंत्र, धमक्‍यांचे सत्र 
गेल्या दोन वर्षांपासून पीडिता तक्रार देण्यासाठी फिरत असून, दिलेल्या तक्रारीवर नामालूम समझोता झाल्याच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येऊन मध्यंतरी प्रकरण मिटविण्यात आले होते. पुन्हा एकदा महिलेने तक्रार देण्याची इच्छा व्यक्त केल्यावर आणि पोलिसांशी संपर्क साधल्यावर शहरातील राजकीय गुंड आणि साजीद पठाण यांचे कुटुंबीय, नातेवाइकांकडून पीडिताला धमकावण्यात येऊन ठार मारण्याच्या धमक्‍याही दिल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com