एक सत्ता बारा कारभारी, सर्वच एकमेकांना भारी! 

एक सत्ता बारा कारभारी, सर्वच एकमेकांना भारी! 

जळगाव : महापालिकेत भाजपची सत्ता आली, इतर पक्षातून घेतलेले दिग्गज निवडूनही आले, सोबत त्यांनी भूषविलेल्या पदाचा अनुभव असल्यामुळे सत्तेत महापौर व स्थायी समिती सभापती पदाधिकारी असले तरी अनुभवाच्या जोरावर अधिकाऱ्यावर दिग्गजांचाच वरचष्मा आहे. पदाधिकाऱ्यांच्या समांतर त्यांचेही अधिकार झाले आहेत. त्यामुळे सत्ता एक असली तरी महापालिकेत कारभारी बारा झाले असून विशेष सर्वच एकमेकांना भारी आहेत. अशा स्थितीत कारभाराचा मात्र "खेळखंडोबा'च झाला आहे. 
भारतीय जनता पक्षाने महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर निवडून येणाऱ्यांची जुळवाजुळव केली. यात जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे यामधील माजी पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना भाजपत प्रवेश दिला. विशेष म्हणजे हे सर्व महापालिकेतील सत्तेतील अनुभवी आहेत. त्यांना महापालिकेतील सर्वच माहिती आहे. यात माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी नगराध्यक्ष, माजी स्थायी समिती सभापती, माजी सत्ताधारी गटातील गटनेते, तर विरोधी पक्षातील गटनेतेही आहेत. सत्तेतील कारभारांची त्यांना माहिती असल्यामुळे महापालिकेच्या कोणता अधिकारी काय करतो, तसेच कोणत्या टेबलावर काय चालते याची त्यांना इत्यंभूत माहिती आहे. 

पदाधिकारी नवखे, अनुभवीचा "पट' 
महापालिकेत भाजपने नियुक्त केलेले पदाधिकारी मात्र नवखे आहेत. महापौर सीमा भोळे यांची दुसरी टर्म आहे, त्यांचे पती आमदार सुरेश भोळे हे महापालिकेत अनुभवी आहेत. हाच एक धागा सोडला तर स्थायी सभापती तर एकदम नवखेच आहेत. तर दुसरीकडे महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे तब्बल 40 नगरसेवक नवखे आहेत. त्यांना महापालिकेच्या कारभाराचा कोणताही अनुभव नाही, अशा स्थितीत अनुभवी असलेले सत्तेतील नगरसेवक त्याच बळावर "आपला पट' मांडत असल्याची कुजबूज आता भाजपच्या गोटातच सुरू आहे. 

समांतर कारभार 
सत्तेतील अनुभवी नगरसेवक काही माजी पदाधिकारी असल्यामुळे अधिकाऱ्यावरही त्यांचा वचक आहे. त्याच बळावर ते आपला अधिकारही गाजवीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे नगरसेवक परस्परच आपल्या अधिकारात संबंधित अधिकाऱ्याकडून आपले काम करवून घेतात. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे हे विषयच येत नाहीत. अधिकारीही त्याबाबत "ब्र'काढीत नाही. त्यामुळे महापालिकेत समांतर "सत्ता' निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्वच एकमेकांना भारी आहेत. भाजपच्या वरिष्ठ स्तरावरील नेते महापालिकेत लक्ष देत नसल्यामुळे कोणत्याही कामात सुसूत्रता दिसून येत नाही. त्याचा फायदा घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करून अडचणीत आणत आहे. त्याचा फटका महापालिकेतील विकास कामांनाही बसत आहे. भाजपतील नेतृत्वाची जिल्ह्यातील दुफळी पाहता सद्या तरी महापालिकेच्या सत्तेतील ही समांतर व्यवस्था छेदण्याचे धाडस कोणीही करू शकतील असे वाटत नाही, कारण या दिग्गजांची नाराजी ऐन निवडणुकीच्या काळात पक्षासह नेत्यांनाही परवडणारी नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com