मनपा'चा अजब कारभार : तीन कर्मचाऱ्यांवर वाहन विभागाची मदार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

जळगाव ः महापालिकेत नागरी सुविधा देण्यासाठी असलेली काही वाहने केवळ देखभाल-दुरुस्तीअभावी पडून असल्याने आरोग्य विभागातील नागरी समस्यांत वाढ होत आहे. वाहन विभागात केवळ तीनच कर्मचारी असल्याने 230 वाहनांची जबाबदारी तीन कर्मचारी कशी सांभाळतील, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. काही वाहने देखभाल-दुरुस्तीअभावी बंदावस्थेत उभी आहेत. 

जळगाव ः महापालिकेत नागरी सुविधा देण्यासाठी असलेली काही वाहने केवळ देखभाल-दुरुस्तीअभावी पडून असल्याने आरोग्य विभागातील नागरी समस्यांत वाढ होत आहे. वाहन विभागात केवळ तीनच कर्मचारी असल्याने 230 वाहनांची जबाबदारी तीन कर्मचारी कशी सांभाळतील, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. काही वाहने देखभाल-दुरुस्तीअभावी बंदावस्थेत उभी आहेत. 
महापालिकेत विविध विभागांत अधिकाऱ्यांसाठी तसेच कामांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी स्वमालकीची 150 वाहने आहेत. या सर्वांची देखभाल-दुरुस्ती, डिझेल व ऑइल पुरवठा, तपासणी, विमा अशा विविध कामांची जबाबदारी वाहन विभागाकडे आहे. गेल्या तीन वर्षांपासून "मनपा'च्या अनेक वाहनांची वेळेवर दुरुस्ती, साहित्य, स्पेअरपार्ट मिळत नसल्याने महिनोन्‌महिने पडून असल्याच्या तक्रारी या सदस्यांकडून महासभा व स्थायी समिती सभांमध्ये सदस्य करतात. परंतु प्रत्यक्षात तीन 
वर्षांपासून या विभागात केवळ तीन कर्मचारी कार्यरत असल्याने वाहन दुरुस्तीची जबाबदारी कशी सांभाळतील? असे दिसते. 

वाहने 230; जबाबदारी तिघांवर 
"मनपा'च्या वाहन विभागासाठी 47 अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे आहेत. परंतु प्रत्यक्षात या विभागात प्रभारी वाहनप्रमुखासह केवळ दोघे कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एवढ्या वाहनांची देखभाल-दुरुस्तीची कामे मोठी असल्याने वाहन दुरुस्तीच्या कामास विलंब होत आहे. त्यात आता घनकचरा प्रकल्पांतर्गत खरेदी केलेल्या 88 वाहनांची नव्याने भर पडली असून, आणखी अनेक वाहने येणे बाकी असून, एकूण 250 वाहनांची संख्या होणार असल्याने आणखी या तीन कर्मचाऱ्यांवर ताण पडणार आहे. 

अनेक वर्षांपासून परिवहन समिती नाही 
"मनपा'च्या मालकीच्या वाहनांची संख्या मोठी असून, आणखी वाहनसंख्या वाढणार आहे. पूर्वी वाहन विभागाव्यतिरिक्त शहर बससेवा, "मनपा'ची वाहने याबाबत धोरणात्मक व देखभाल-दुरुस्तीवर या समितीकडून लक्ष ठेवले जात असे. परंतु गेल्या आठ-दहा वर्षांपासून परिवहन समिती स्थापन झाली नाही. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी "मनपा'तील अनेक समित्या स्थापन न करताच कारभार केला. आता भाजपची सत्ता असून पूर्वी स्थापन नसलेली प्रभाग समिती स्थापन करून प्रभाग समितीनुसार कामांवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे परिवहन समितीचेही "मनपा'त गठण होणे आवश्‍यक असल्याचे बोलले जाते. 

वाहन विभागावर असा आहे ताण 
या विभागाकडे वाहनांचे नियोजन, देखभाल-दुरुस्ती, कालबाह्य वाहने निर्लेखित करणे, दुरुस्तीसाठी पाठविणे, डिझेल, ऑइल खर्चाची नोंदणी, डिझेलपंप, पर्यायी वाहनांचे नियोजन, चालकांचे नियोजन, आरटीओ वाहन तपासणी, फिटनेस, विमा, कागदपत्रे तयार करणे, नवीन वाहने खरेदी अशा विविध कामांचा ताण आहे. 

वाहन विभागात ही पदे आवश्‍यक 
वाहन भागात प्रमुख मेकॅनिकल अभियंता (1), कनिष्ठ मेकॅनिकल अभियंता (3), फोरमन (2), हेड मेकॅनिक (2), वाहन परीक्षक, मेकॅनिक (7), ऑटो इलेक्‍ट्रिशियन कारागीर (4), डिझेल मेकॅनिक (2), स्टोअर किपर (2), लिपिक (5), डिझेल पंपचालक (2), वेल्डर (2), टायर फिटर (2), ऑइलमन (2), गॅरेज हेल्पर (3), स्वच्छक (यांत्रिक) (4), शिपाई (3). 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation 3 workrs vahan department