मनपा'च्या 81 बॅंक खात्यांत दीडशे कोटी पडून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे. 

जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे. 
स्थायी समितीच्या सभेत अग्निशमन विभागाला डीपीसी मंजूर सत्तर लाख रुपयांचा निधी "मनपा'कडे येऊन महिना होऊनही त्याचा विनियोग झाला नसल्याचे समोर आले होते. याबाबत आज उपमहापौर डॉ. आश्‍विन सोनवणेंनी आयुक्तांना पत्र पाठवून महापालिकेच्या विविध बॅंकांच्या खात्यात किती शिल्लक आहे. तसेच शासनाकडून आलेल्या निधीचा कसा विनियोग करण्यात आला आहे, याची माहिती विचारली आहे. त्यानुसार "मनपा'च्या अर्थ विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही शिल्लक रकमेची आकडेवारी समोर आली आहे. 

गाळेभाडे जमाखर्च रकमेची माहिती द्या ः उपमहापौर 
"मनपा'च्या मुदत संपलेल्या संकुलातील गाळेधारकांना दिलेल्या गाळेभाड्यांचे बिल दिले होते. गाळेधारकांनी बिलापोटी काही रक्कम भरली होती. यातून बावीस कोटी रुपये जमा झाले होते. याबाबत हा पैसा केवळ "हुडको'च्या कर्जफेडीत वापरण्याबाबत ठरावही झाला होता. परंतु हा जमा निधीतून वीजबिल, वाहन दुरुस्ती, शिक्षकांचे वेतन, कर्मचारी वेतन, भूसंपादन, पगार कपात, कर्मचाऱ्यांचे पगार आदी बांधकाम आदी कामांसाठी खर्च केल्याने 22 कोटींतून केवळ 18 लाख रुपये आता शिल्लक आहे. याबाबत उपमहापौरांनी सविस्तर खर्च झालेल्या कामांची माहिती मागविली आहे. 

वित्त आयोगाचे निधी पडून 
उपमहापौरांना देण्यात आलेल्या बॅंक खात्यांच्या आकडेवारीत गेल्या अनेक वर्षांपासून निधी खर्च झाला नसल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने 10, 11, 12, 13 व्या वित्त आयोगाचे सुमारे 23 कोटी आणि 14 चौदाव्या वित्त आयोगाचे, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, विद्युत घरपट्टी विभागाच्या कामांसाठी 38 कोटी 85 लाख 61 हजार 269 निधी पडून आहे. 

या मुख्य विभागांचे निधी पडून 
अमृत योजनेचे सुमारे 25 कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच एक कोटीपेक्षा अधिक निधी निवडणुकीचा शिल्लक आहे. नगररचना प्रिमियम खात्यातही दोन कोटी 25 लाखांचा निधी, शहरी एकात्मिक गृहनिर्माण योजनेचा एक कोटी चाळीस लाख आणि आग सुरक्षा निधीतून अग्निशमन विभागाला मिळालेल्या निधीपैकी एक कोटी 81 लाख रुपये, विकासकामे योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांनी बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत विभागाला दिलेले तीस कोटी 98 लाख निधी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत बांधकाम विभागाकडे एक कोटी 26 लाख, दलितवस्ती सुधारणा बांधकाम योजनेतून प्राप्त निधीतून बांधकाम विभागाकडे तीन कोटी 16 लाखांचा निधी पडून आहे. 

अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव 
महापालिकेवर कर्जाचा डोंगर असल्याने शहरात विकासकामे करता येत नसल्याने वेळोवेळी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. परंतु "मनपा'च्या विविध बॅंक खात्यांत विविध कामांचे तब्बल दीडशे कोटी रुपये पडून असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे "मनपा'तील अधिकाऱ्यांकडून विकासकामांसाठी निधी असून अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव व गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. 

आमदार, खासदारांचा निधी पडून 
माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी आमदार मनीष जैन, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, खासदार ए. टी. पाटील, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, माजी खासदार विजय दर्डा यांनी विकासकामांसाठी दिलेल्या सुमारे बारा कोटींचा निधी हा खर्च केला नसल्याचे समोर येत आहे. 

अशी आहे आकडेवारी 
- "मनपा'ची आठ बॅंकांमध्ये खाती 
- विविध प्रकारच्या निधीसाठी 81 खाती 
- बॅंकेत एकूण दीडशे कोटी रुपये जमा 
- आमदार, खासदारांचे बारा कोटी रुपये पडून 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation bank 150 caroore cash pending