महापालिकेत भाजपची समविचार पक्षांशी युती : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वाबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही त्यांनी सांगितले. 

जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वाबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही त्यांनी सांगितले. 
महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती न करता स्वतंत्र लढावे, असे मत भाजप व शिवसेनेतील कार्यकर्त्यांचे आहे. मात्र, भाजपचे नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, तसेच शिवसेना नेते तथा माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी युतीचा आग्रह धरला आहे. त्यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे युतीबाबत संभ्रम कायम होता. शिवाय, निवडणुकीत भाजपचे नेतृत्व कोण करणार, याबाबतही प्रश्‍नचिन्ह होते. 

समविचारी पक्षांशी युती 
पालकमंत्री पाटील आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. नाशिक शिक्षक मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार अनिकेत विजय पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी पद्मावती मंगल कार्यालयात सभा घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महापालिका निवडणुकीबाबत ते म्हणाले, की समविचारी पक्षांशी भाजपची युती होईल. त्या पक्षांसोबत चर्चा करून त्यांच्यासमवेत निवडणूक लढविण्यात येईल. 
 
खडसे, महाजन, भोळेंचे नेतृत्व 
महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाचा वाद निर्माण झाला आहे. गेल्या निवडणुकीत आमदार एकनाथ खडसे यांनी नेतृत्व केले होते. यावेळी कोण नेतृत्व करणार, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांनीच उपस्थित केला होता. याबाबत पालकमंत्री पाटील यांना विचारले असता; ते म्हणाले, की माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांची कोअर कमिटी असेल. आमदार चंदूलाल पटेल, आमदार स्मिता वाघ हे शहरातील आमदारांना मदत करतील. कोअर कमिटीतील नेतृत्वाबाबत निर्णय मात्र मुख्यमंत्री घेतील. 
 
महापौर भाजपचाच 
महापालिकेत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा विश्‍वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेत पक्षाचीच सत्ता येणार असून, महापौर भाजपचा होईल, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation chandrakant patil