आमदार पत्नीच्या उमेदवारीने प्रभागात रंगत 

आमदार पत्नीच्या उमेदवारीने प्रभागात रंगत 

शहराच्या नव्या प्रभाग रचनेत क्षेत्रफळाचा विचार करता सर्वांत मोठा मात्र लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान प्रभाग म्हणून प्रभाग क्र. 19 ची ओळख. चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नीची उमेदवारी, हीदेखील या प्रभागाची अलीकडची ओळख देता येईल. आमदारपत्नीच्या उमेदवारीनेच या प्रभागातील लढतींकडे लक्ष लागले आहे. भाजप-शिवसेना उमेदवारांमधील लढतींची चुरस या प्रभागातही पाहावयास मिळेल, मात्र त्यातील तीनपैकी दोघा अपक्षांना पुरस्कृत करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली आहे. 
-- 
जुन्या प्रभाग क्र. 34 व 35 चा काही भाग नव्याने जाहीर झालेल्या रचनेत प्रभाग क्र. 19 मध्ये समाविष्ट झाला आहे. हा परिसर मिळून सुप्रिम कॉलनी व एमआयडीसीचा भाग असा हा प्रभाग आहे. क्षेत्रफळाने मोठा, परंतु लोकसंख्या व पर्यायाने मतदारसंख्या कमी असलेला हा प्रभाग. मतदारसंख्येनुसार प्रभाग रचना व त्यातील जागा ठरत असल्याने जळगाव शहरातील 19 प्रभागांमधील या सर्वांत शेवटच्या प्रभागात तीनच नगरसेवक या परिसराचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

आमदार पत्नी रिंगणात 
अनेक वर्षांपासून या भागाने सुरेशदादा जैन यांच्या गटाला सातत्याने कौल दिल्याचे दिसते. मात्र, भाजपने आपली ताकद या प्रभागातून आजमावली आहे आणि प्रसंगी दाखविलीही आहे. सद्य:स्थितीत या प्रभागातील "अ'मधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लताबाई सोनवणे या शिवसेनेच्या उमेदवार असून, भाजपच्या शरिफा तडवी यांच्याशी त्यांची सरळ लढत आहे. लताबाई विद्यमान नगरसेविका असून, स्वत: प्रा. सोनवणे याच प्रभागातून या आधी निवडून आले आहेत. नंतर ते विधानसभेवर गेल्याने त्यांनी राजीनामा दिला व लताबाई निवडून आल्या. त्यामुळे शरिफा तडवी त्यांचा सामना कसा करतात, हे पाहावे लागेल. 

अन्य दोघेही शिवसेना पुरस्कृत 
या प्रभागातून अर्ज भरण्यात शिवसेनेकडून काहीसा गोंधळ झाला. त्यामुळे प्रभाग क्र. 19 मधील "ब' व "क' या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार "अपक्ष' म्हणून समोर आले आहेत. "एबी फॉर्म'मधील चुकांमुळे विक्रम सोनवणे यांना "ब'मधून, तर जिजाबाई भापसे यांना "क'मधून पुरस्कृत करण्याची वेळ शिवसेनेवर आली. "ब'मध्ये विक्रम सोनवणे, कॉंग्रेसचे सुरेश तितरे व भाजपचे ललित कोळी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. कॉंग्रेसचे उमेदवार किती मते घेतात, याबद्दल उत्सुकता आहे. तर ललित कोळी व विक्रम सोनवणे यांच्यातील लढत किती रंगतदार ठरते, हेही पाहावे लागेल. "क' गटातून सुरेशदादांचे कट्टर समर्थक अण्णासाहेब भापसे यांच्या पत्नी जिजाबाई व भाजपच्या ज्योती विठ्ठल पाटील यांच्यात लढत होत आहे. अपक्ष उमेदवार आशाबाई नन्नवरेही रिंगणात आहेत. या प्रभागात भापसेंचे नाव परिचित असले, तरी गेल्या पाच वर्षांतील बदलत्या स्थितीचा लढतींवर परिणाम होऊ शकतो. त्यातच जिजाबाई भापसेंना पुरस्कृत करण्यात आल्याचाही परिणाम लढतीवर होऊ शकेल, असे मानले जात आहे. 
एकंदरीत प्रभाग लहान, मतदार कमी असले तरी त्याचा परिसर मोठा आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांचा संपर्क जोरात सुरू असून प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांची दमछाक होत आहे. या प्रभागातील निकालावर कदाचित सत्तेचे गणित अवलंबून असेल, असेही बोलले जात आहे. प्रत्यक्षात काय होते, ते पाहण्यासाठी निवडणूक निकालापर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com