जागोजागी कचरा, एकमुस्त ठेका रद्द करा 

जागोजागी कचरा, एकमुस्त ठेका रद्द करा 

जळगाव ः शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. एकमुस्त ठेक्‍याचे काम सुरू झाल्यानंतरही जागोजागी कचरा साचलेला आहे. पंधरा दिवसांत शहरातील स्वच्छतेचे "तीनतेरा' वाजले आहेत, अशा शब्दांत तीव्र भावना व्यक्त करत विरोधी सदस्यांनी वॉटरग्रेस कंपनीला दिलेला एकमुस्त ठेका रद्द करावा, अशी मागणी केली. तर सत्ताधारी भाजपने मात्र आताच मक्ता सुरू झाला आहे. काही दिवस वाट पाहावी लागेल, असा पवित्रा घेतला. यादरम्यान महासभेत तीन-चार वेळा सत्ताधारी व शिवसेना सदस्यांमध्ये एकमेकांवर आरोप केल्याने प्रचंड गोंधळ झाला. 
महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा झाली. व्यासपीठावर उपमहापौर डॉ. आश्‍विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, नगरसचिव सुनील गोराणे होते. 

वेळ द्यावा लागेल ः सोनवणे 
शहरातील स्वच्छतेसाठी एकमुस्त ठेका शहरासाठी फायदेशीर आहे. ठेक्‍याला सुरू होऊन चौदाच दिवस झाले असून मक्तेदार काही कामाचा नाही असे म्हणता येणार नाही. मक्तेदाराकडून चुका झाल्या. नियोजनात कमी असून त्यांना आणखी नियोजन करावे लागणार आहे. याबाबत त्यांना दंड आकारला आहे. त्यांना त्यांची यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. किती कर्मचारी हवे, वाहने किती तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या वस्तू देणे, 489 रुपये रोज देणे, पीएफ, इएसआयसी आदी देणे बंधनकारक आहे, अशी भूमिका कैलास सोनवणे यांनी मांडली. 

स्वच्छता "क्रिप्टो' करन्सीसारखी ः लढ्ढा 
स्वच्छतेचा एकमुस्त ठेका देण्यात प्रशासनाने घाई केल्याचे दिसून येते. मक्तेदाराकडून कचऱ्याचे वजन वाढविण्याचा प्रकार प्रशांत नाईक यांनी उघड केला आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता मक्तेदार व्यवस्थित करेल याची साशंकता आहे. त्यामुळे "क्रिप्टो' करन्सीसारखी शहरातील स्वच्छता कागदावर दिसत आहे. त्यामुळे मक्ता रद्द करावा, अशी मागणी माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी केली. 

धुळे, नाशिकमध्ये तक्रारी ः भंगाळे 
वॉटरग्रेस कंपनीचा धुळे व नाशिक शहरात स्वच्छतेचा मक्ता आहे. तेथेदेखील या मक्तेदाराच्या असंख्य तक्रारी आहेत. तेथील सत्ताधारी व प्रशासन मक्‍तेदारामुळे हैराण आहे. स्वच्छता होत नसल्याने नागरिकांचे फोन येत असून आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हा मक्‍ता रद्द करावा, अशी मागणी शिवसेना सदस्य विष्णू भंगाळे यांनी धुळे येथील "सकाळ'चा अंक दाखवून केली. 

शाब्दिक चकमकीमुळे गोंधळ 
दीड तासापासून एकाच विषयावर चर्चा सुरू असल्याने भाजप सदस्य सचिन पाटील यांनी आक्षेप घेतला. विरोधी पक्षाकडून तेच-तेच मुद्दे उपस्थित केले जात असून यात सभागृहाचा वेळ जात आहे, असे मत व्यक्त केले. त्यावर भंगाळेंनी संतप्त होत आम्ही लक्षवेधी सूचना मांडली, आम्हाला बोलू दिले जात नाही, असा आरोप केला. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांत वाद झाला. यावेळी भाजप 
गटनेते भगत बालाणी यांच्याकडून शिवसेना सदस्य अमर जैन यांच्यात बसण्यावरून वाद झाला. त्यात ते एकमेकांवर धावून आल्याने गोंधळ उडाल्याचे चित्र महासभेत दिसले. 

महिला सदस्यांचा संताप 
शहरातील अस्वच्छता व स्वच्छतेच्या ठेक्‍याबाबत लढ्ढा व सोनवणे यांच्यात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान लढ्ढा यांच्याकडून महिलांसंदर्भात चुकीचा शब्द वापरला गेला, असे भाजपच्या महिला सदस्यांना वाटले. यावरून सरिता नेरकर व ज्योती चव्हाण यांनी महिलांची आधी माफी मागावी असा पवित्रा घेतला. यावेळी विरोधी सदस्यांनी सोनवणेदेखील बोलले आहे असे सांगितल्यावर पुन्हा महासभेत गोंधळ झाला. 

"साहेब मक्ता देताना तुम्ही चुकले' 
दैनंदिन स्वच्छतेचा ठेका देण्यात प्रशासनाकडून चूक झाली आहे. आयुक्त साहेब स्वच्छता अभियानाचे संचालक होते, त्यांना कामाचा दांडगा अनुभव असतानाही हा मक्ता देण्यात त्यांची चूक झाली आहे, असा आरोप लढ्ढा यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com