पंधरा वर्षांत बारा महापौर देण्याची किमया 

पंधरा वर्षांत बारा महापौर देण्याची किमया 

जळगाव : महापालिकेतील पद आणि त्याचा कालावधी शहराच्या विकासाशी निगडित असतो. पाच वर्षांच्या टर्ममध्ये महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा ठरलेला आहे. या अडीच वर्षांत महापौरांनी आपले कौशल्य दाखवून शहराचा विकास करावयाचा आहे. जळगावात मात्र महापौर पद नियुक्तीचा वेग शासकीय नियमांच्या पुढे गेला आहे. पंधरा वर्षात तब्बल बारा महापौर झाले आहेत. पदांच्या नियुक्तीच्या वेगात विकासाचा वेग मात्र संथच राहिला. कर्जफेडीच्या बोझ्यात विकासाचे कामही हरपले, गेल्या पंधरा वर्षात कामाची एकही कोनशिला लागली नाही. 
स्थानिक स्वराज्य संस्थेना अधिकार देत असताना प्रत्येक पदाला पाच वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. पुढे पद राखीव झाल्यानंतर अडीच वर्षांचा कालावधी पदांसाठी निश्‍चित करण्यात आला. या कालावधीत महापौरांनी महासभेत धोरणात्मक निर्णय घेऊन विकासाची कामे मार्गी लावायची असतात. या नियमानुसार पाच वर्षांत दोन महापौरांची निवड होऊन तीन टर्ममध्ये सहा महापौरांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. 


जळगावात कालावधी वर्षाचाच 
जळगाव महापालिका स्थापनेनंतर 2003 पासून महापालिकेवर सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालीच सत्ता आहे. आशा कोल्हे या जळगावच्या पहिल्या महापौर झाल्या. त्यांचा कालावधी दोन वर्षे होता. त्यानंतर तनुजा तडवी दोन वर्षे महापौर होत्या. पहिल्या पाच वर्षांत नियमानुसार बरोबर दोन महापौर झाले. 2008 मध्ये पुन्हा खानदेश विकास आघाडीची सत्ता आली. या पाच वर्षांच्या कालावधीत चक्क सात महापौर झाले. साठ महिन्यांच्या कालावधीत एका महापौरास सरासरी साठ महिन्यांचा कालावधी कामासाठी मिळाला. पद मिळाल्यानंतर त्याची माहिती घेण्यासाठीच दोन- तीन महिन्यांचा वेळ जातो. अशा स्थितीत उर्वरित पाच महिन्यांत महापौरांनी कामासाठी किती वेळ मिळाला, हे एक कोडेच आहे. त्यानंतरही सन 2013 मध्ये खानदेश विकास आघाडीलाच कौल मिळाला. या कालावधीतही तीन महापौर झाले. त्यामुळे पंधरा वर्षांत सहा महापौर होणे गरजेचे असताना त्याठिकाणी दुप्पट बारा महापौर झाले. कमी कालावधीत जास्त महापौर देण्याची किमया केवळ जळगावात साधून विक्रम केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

"विकास' मात्र संथच 
पंधरा वर्षांत बारा महापौर झाले, पद देण्याचा वेग हा काळापेक्षाही पुढे होता. परंतु त्या वेगात विकास मात्र झाला नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या पंधरा वर्षांत विकास कामाची एकही कोनशिला लागली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागले. अर्थात शासनाकडून न मिळणारे सहकार्य, कर्जफेडीत येणारे व्यत्यय तसेच गाळे करारात अडचणी अशी अनेक कारणे सत्ताधारी गटाकडून देण्यात येतीलच. त्यात तथ्य असले तरी मिळालेले पद आणि त्यातूनही "विकास' साध्यच होत नसेल तर शहरवासियांसाठी त्याचा उपयोग काय? हा प्रश्‍न आहे. परंतु आगामी कालावधीत तरी पद आणि विकास काम याचा विचार व्हावा, अशी अपेक्षा आहे. 
 
महापौर आणि त्यांचा कार्यकाळ 
आशा कोल्हे : 21 सप्टेंबर 2003 ते 20 मार्च 2006 
तनुजा तडवी : 21 मार्च 2006 ते 20 सप्टेंबर 2008 
रमेश जैन : 22 सप्टेंबर 2008 ते 28 ऑक्‍टोबर 2009 
प्रदीप रायसोनी : 30 नोव्हेंबर 2009 ते 21 मार्च 2011 
अशोक सपकाळे : 22 मार्च 2011 ते 5 सप्टेंबर 2011 
सदाशिव ढेकळे : 20 सप्टेंबर 2011 ते 20 मार्च 2012 
विष्णू भंगाळे :4 एप्रिल 2012 ते 20 सप्टेंबर 2012 
जयश्री धांडे : 3 ऑक्‍टोबर 2012 ते 15 मार्च 2013 
किशोर पाटील : 28 मार्च 2013 ते 19 सप्टेंबर 2013 
राखी सोनवणे : 20 सप्टेंबर 2013 ते 9 मार्च 2016 
नितीन लढ्ढा : 10 मार्च 2016 ते 23 जुलै 2017 
ललित कोल्हे : 7 सप्टेंबर 2017 ते आतापर्यंत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com