महाभारत.. महापालिका अन्‌ राजकीय कुरूक्षेत्र! 

महाभारत.. महापालिका अन्‌ राजकीय कुरूक्षेत्र! 

 जळगाव महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेनेत सध्या विविध मुद्यांवरून जोरदार वाद सुरू आहे. सत्तेत असताना शिवसेनेने काय केले? हा भाजपचा प्रश्‍न; तर सत्तांतरानंतर शहराचे प्रश्‍न सोडविण्यात भाजप असमर्थ ठरत असल्याचा दावा शिवसेना करीत आहे. "मनपा' निवडणुकीनंतरच्या तीन महिन्यांत भाजपचा मर्यादित अनुभवही पदोपदी समोर येत आहे. त्यातूनच महापौर व आमदार म्हणून शहराचे नेतृत्व करणाऱ्या सुरेश भोळेंभोवती चक्रव्यूह निर्माण झालाय. आता लोकसभा आणि वर्षभरात विधानसभेच्या रणसंग्रामाआधी हा चक्रव्यूह ते कसा भेदतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 

चार वर्षांपूर्वी आमदारकीला आणि तीन महिन्यांपूर्वी महापालिका निवडणुकीत जळगावकरांनी भाजपच्या पदरात भरभरून मते टाकली. विधानसभा निवडणुकीनंतर चार वर्षांनी "मनपा' निवडणुकीतही गिरीश महाजन व आमदारांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शवत जळगावकरांनी "मनपा'ची सत्ताही भाजपकडे सोपविली. आमदारांची कार्यकक्षा आणि प्रत्यक्ष कामही वेगळे असते, म्हणून शहरातील मूलभूत सुविधांशी ते जोडले जाऊ शकत नाही, हे खरे. दुर्दैवाने तेवढी राजकीय आणि प्रशासकीय साक्षरता सर्वसामान्यांत नसल्याने ते सामान्य मूलभूत सुविधांचा मुद्दाही आमदाराच्या कामांशी जोडतात. परंतु, आता "मनपा'तील सत्ताप्राप्तीनंतर आणि विशेषत: पत्नीच्या माध्यमातून महापौरपद स्वत:कडे ठेवल्यानंतर सहा महिने, वर्षभराने का होईना "मनपा'शी संबंधित प्रलंबित प्रश्‍न व नागरी सुविधांबद्दल सुरेश भोळेंनाच जाब विचारला जाईल. 
"मनपा'त सुरेशदादा जैनांच्या नेतृत्वातील आघाडी (सध्याची शिवसेना) सत्तेत असताना भाजपकडून मोठे आरोप होत होते व त्या आधारे घोषणाही केल्या जात होत्या. आता या घोषणा सत्यात उतरविण्याची जबाबदारी भाजपची आहे, तर दुसरीकडे विरोधात गेलेली शिवसेना भाजपवर टीका करायला मोकाट. विशेष म्हणजे विधानसभेचे प्रतिनिधित्व असताना महापौरपदही सुरेश भोळेंच्याच घरात गेल्यामुळे सेनेच्या आरोपांची "धार' तीव्रच राहणार. हे आरोप करताना शिवसेनेने सत्तेत असताना काय केले? हा प्रश्‍न रास्त आणि न्याय्य असला तरी आता तो भूतकाळ झाला, जैन गटाने काहीही केले नाही म्हणूनच तुम्हाला निवडून दिले, असे भाजपला लोक सुनावू शकतात. 
सध्या "मनपा' प्रशासनाने सुरू केलेली अतिक्रमणविरोधी कारवाई व सर्वांत कळीचा मुद्दा बनलेला गाळेधारकांचा प्रश्‍न या दोन्ही उदाहरणांवरून सत्ताधारी-विरोधकांत वाक्‌युद्ध पेटलेय. गेल्या 35 वर्षांचा पालिका राजकारणातील जैनांच्या गटाचा अनुभव बघता "मनपा'तील 75 पैकी 57 नगरसेवकांची फौज असलेल्या भाजपला हे आव्हान पेलणे सध्यातरी कठीण जात असल्याचे चित्र दिसते. हे आव्हान नव्हे; तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दिशेने सुरेश भोळेंसाठी तयार होत असलेले चक्रव्यूह आहे. 


महाभारतात गुरू द्रोण, कृपाचार्य, भीष्म या पांडवांच्या आप्तेष्टांसह कौरवांनी रचलेल्या चक्रव्यूहात अभिमन्यूचा बळी जातो.. अर्जुनास चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान अवगत असते, श्रीकृष्णासारखा सारथीही त्यासोबत असतो.. पण अर्जुन अभिमन्यूला वाचवू शकत नाही. मनपाच्या राजकीय पटलाला कुरुक्षेत्र आणि आगामी निवडणुकीसाठी सुरू असलेले डावपेच चक्रव्यूहाची तयारी मानले तर गिरीश महाजनांसह सुरेश भोळे, सुरेशदादा जैन, नितीन लढ्ढा, ललित कोल्हे, सुनील महाजन, भगत बालाणी आणि कैलास सोनवणे यांची पात्रे कोणती असावीत, हे प्रत्येकाने आपापल्या परीने समजून घेण्याचा विषय आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com