निष्ठावंतांची नाराजी भाजपसाठी तारक की मारक? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड समितीने उमेदवारी दिली; तर भाजप नेते एकनाथ खडसेंचे समर्थक मानले जाणारे विद्यमान नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, महिला आघाडीचे विद्यमान व माजी पदाधिकारी अशा बारा-तेरा निष्ठावंतांना उमेदवारी नाकारली. त्यातील काहींनी "अपक्ष' उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नाराज निष्ठावंत भाजपसाठी तारक ठरतात की मारक?

जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड समितीने उमेदवारी दिली; तर भाजप नेते एकनाथ खडसेंचे समर्थक मानले जाणारे विद्यमान नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, महिला आघाडीचे विद्यमान व माजी पदाधिकारी अशा बारा-तेरा निष्ठावंतांना उमेदवारी नाकारली. त्यातील काहींनी "अपक्ष' उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नाराज निष्ठावंत भाजपसाठी तारक ठरतात की मारक? हे निवडणूक निकालातच स्पष्ट होईल. 
जळगाव महापालिका निवडणूक भाजपने शिवसेनेशी युती करून लढवावी, अशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी भूमिका घेतली होती. त्याचाच भाग म्हणून मंत्री महाजन व जैन यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटही घेतली. त्यात फडणवीस यांनी जागावाटपाबाबत चर्चा करून युतीवर शिक्कामोर्तब करण्याचा सल्ला दोन्हीही नेत्यांना दिला होता. मात्र, आमदार सुरेश भोळे व मंत्री महाजन यांच्याकडे पक्षकार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीरपणे प्रदर्शित केली होती. तसेच भाजप नेते एकनाथ खडसे यांचीही युतीसाठी सहमती नव्हती. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींना निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी, असे सुचविले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत शिवसेना व भाजप या दोन्हीही पक्षांतील नेत्यांनी चर्चेची वाट पाहिली. परंतु पक्षांतर्गत भूमिकांमुळे युती न होताच दोन्हीही पक्षांनी संपूर्ण 19 प्रभागांतील 75 उमेदवारांची यादी जाहीर करीत त्यांना ऐनवेळी "एबी फॉर्म' दिले. दरम्यान, त्याआधीच इतर पक्षांतील दिग्गजांनी उमेदवारी देण्याची अट पक्षनेतृत्वाकडून मंजूर करवून घेत भाजपमध्ये प्रवेश केलेला असल्याने पक्षातील निष्ठावंतांना उमेदवारी नाकारली गेली. त्यात प्रामुख्याने खडसे समर्थक बारा-तेरा जणांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांनी "अपक्ष' उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे. 

डावललेले निष्ठावान 
पृथ्वीराज आत्माराम सोनवणे (विद्यमान नगरसेवक), जयश्री नितीन पाटील, शिवदास साळुंखे (माजी नगरसेवक), सना जहॉंगीर (महिला आघाडी उपाध्यक्षा, शिवाजीनगर), जयश्री उमेश पाटील (महानगर महिला आघाडी पदाधिकारी), जितेंद्र चव्हाण (उपाध्यक्ष, भाजयुमो), राजेंद्र मराठे, भगवान सोनवणे, किशोर वाघ, चंदन महाजन यांच्यासह प्रदीप रोटे, राहुल पाटील, सुशील हासवानी, राहुल रमेश वाघ (चौघे मंडळ अध्यक्ष), प्रवीण संतोष पाटील (चिटणीस, मंडळ क्र. 4), चेतन शर्मा, प्रवीण कुलकर्णी, रिंकू चौधरी यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal election bjp