मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतरही "मनपा'ची अवाजवी बिले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

जळगाव : महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या कराची अवाजवी बिले वाटप करण्याच्या निषेधार्थ गाळेधारकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गाळ्यांसंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसतानाही महापालिकेने पुन्हा बिले वाटप सुरू केल्याने गाळेधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गाळेधारकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत नाराजी व्यक्त केली. 

महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना थकबाकीची मोठ्या प्रमाणावर बिले अदा करण्यात येत आहेत. त्याविरुद्ध गाळेधारकांनी नुकतेच जोरदार आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गाळेधारकांच्या प्रश्‍नावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्यापही निर्णय घेतला नाही. अशा स्थितीत महापालिकेने पुन्हा गाळेधारकांना बिले देण्यास प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे या बिलाची रक्कम अवाजवी आहे. गाळेधारकांत पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गाळेधारकांची बैठक 
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील वीस गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज दुपारी शाहूनगर व्यापारी संकुलात बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाचे काय झाले? असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. न्याय मिळाला नाही तर पुढील नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. 

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट 
गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेतली. आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी व पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची आठवणही करून देण्यात आली. त्यांनी आश्‍वासन दिल्यानंतरही ही बिले का देण्यात येत आहेत? असा प्रश्‍नही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. त्यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी आपण गाळेधारकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविणार असल्याचे आश्‍वासन दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी हिरानंद मंधवाणी, राजस कोतवाल, संजय पाटील, रमेश मताणी, तेजस देपुरा, राजेश पिंगळे, पंकज मोमाया, वसीम काझी, राजेश वरयानी, बाळासाहेब पाटील, सुजित किनगे, दीपक मंधान यांसह सुमारे चाळीस प्रतिनिधींनी उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon muncipalcorporation