"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर जळगावकरांना शुद्ध पाणी द्या !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

सफाईच्या ठेक्‍याबाबत चर्चा होऊन त्यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा व सध्या ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्यास वेळमर्यादा घालून देणे आवश्‍यक असल्याचे यावेळी ठरले. 

जळगाव :  शहरात "कोरोना'बाधितांची संख्या वाढतच आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे अपेक्षित आहे. पावसाळाही तोंडावर येऊन ठेपला असताना उमाळा जलशुद्धीकरण केंद्रातील क्‍लोरीनच्या चार प्लांटपैकी एकच सुरू असून, इतर बंद आहेत. त्यामुळे आधीच "कोरोना'चे थैमान त्यात दूषित पाणीपुरवठा झाल्यास जळगावकर मोठ्या संख्येने आजारी पडतील. त्या पार्श्‍वभूमीवर तातडीने क्‍लोरीनचा बंद प्लांट तत्काळ सुरू करावा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी शिवसेना सदस्यांनी आज केली. 

आर्वजून पहा : नाशिकहून रात्री आला; चिठ्ठीवर आई- वडीलांचा नंबर लिहून केले असे 
 

महापालिका स्थायी समितीची सभा स्थगित व दुसरी नियमित सभा आज सभापती ऍड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यात त्यांनी ही मागणी केली. आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरससचिव सुनील गोराणे व्यासपीठावर होते. 

दरम्यान, "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर ही सभा रद्द केली जावी, अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी केली होती. मात्र, स्थायी समितीच्या सभापतींनी सभेच्या अजेंड्यावरील विषय पत्रिकेसंबंधित अधिकाऱ्यांना सभागृहात प्रवेश देऊन ही सभा पार पाडली. आठ एप्रिलला "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सभा तहकूब केली होती ती व दुसरी नियमित सभा आज घेण्यात आली. प्रथम अकरा वाजता तहकूब सभेत चार विषय होते. त्यात डॉ. आंबेडकर उद्यान विकास, तसेच लेखा परीक्षण व सविधानाची माहिती घेण्यात येण्याचा विषय होता ते घेण्यात आले. 

नक्की वाचा :  जळगावात येथे होता हायप्रोफाईल कुंटनखाना; महाविद्यालयीन युवतींना घेतले ताब्यात 
 

नालेसफाईचा सदस्यांकडून आढावा 
पहिली सभा संपल्यावर नियमित सभेच्या विषयपत्रिकेवरील नऊ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यात उमाळा जलशुद्धीकरण केंद्रास तुरटी खरेदीला मंजुरी देण्यात आली. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईच्या मुद्यांवर चर्चा करून प्रशासनास सूचना देण्यात आल्या. सफाईच्या ठेक्‍याबाबत चर्चा होऊन त्यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा व सध्या ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्यास वेळमर्यादा घालून देणे आवश्‍यक असल्याचे यावेळी ठरले. 

कुठे गेले सभेला विरोध करणारे? 
स्थायी समितीची सभा घेण्यावरून महापालिकेतील विरोधी पक्ष शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभा घेण्याचे प्रयोजन काय? असे आरोप करीत सभा घेतल्यास आंदोलन करण्याचे सांगितले होते. परंतु आज सभा नियोजित वेळी सुरू होऊन शिवसेना सदस्य उपस्थित राहून सर्व विषय सर्वानुमते मान्य करण्यात आले. याबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपात तथ्य नव्हतेच, असे सभापती ऍड. हाडा यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांना "फिजिकल डिस्टन्सिंग'च्या नियमामुळे बसू न दिल्याबद्दल ऍड. हाडांनी दिलगिरी व्यक्त केली. 

 क्‍लिक कराः पांढरे सोने विक्रीसाठी बळीराजा होतोय पिवळा 

इतरांना "एन्ट्री'; पत्रकारांना "नो एन्ट्री'? 
स्थायी समिती सभेच्या सुरवातीला सभापती ऍड. हाडा यांनी "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर "फिजिकल डिस्टन्सिंग'च्या नियमावरून पत्रकरांना सभेत बसू देण्यास नकार दिला. त्यावरून शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी हा निर्णय योग्य नव्हता, असे मत मांडले. तसेच शिवसेना सदस्य नितीन बरडेंनीही सभागृहात बरीच जागा आहे. नियमांचे कुठेही उल्लघंन होत नव्हते. शेवटी सभेत कोणाला बसू द्यावे, हा सभापतींचा निर्णय असतो. मात्र, सभेदरम्यान "स्थायी'चे सदस्य नसलेल्या सदस्यांना बसण्याची कशी काय परवानगी दिली गेली? असा प्रश्‍न आता उभा राहिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Municipal Corporation stynding meeting Opposition party Give pure water demand