महामार्गावर 12 कि.मी.च्या टप्प्यात 43 जीवघेणे खड्डे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

जळगाव ः शहरातून जाणारा महामार्ग क्रमांक सहा मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करत जावे लागते. शहरातील आकाशवाणी चौक ते पाळधी या बारा किलोमीटर अंतरावर तब्बल 43 जीवघेणे खड्डे असल्याचे "सकाळ'च्या पाहणीत आढळून आले. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात आजवर अनेक बळी गेले आहेत, तसेच साईडपट्ट्याच नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळते. ही अपघातामागील मुख्य कारणे दिसून आली आहेत. 

अनेक महाविद्यालयीन युवक, युवतींना शिक्षण घेण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने महामार्गावरूनच जावे लागते. महामार्गावरून जाताना वाहनधारकाने "हेल्मेट' घालून वाहन चालविणे ही वाहनधारकासाठी सुरक्षितता आहे. अपघात झाला तर किमान हेल्मेटमुळे डोक्‍याला गंभीर दुखापत होणार नाही. मात्र, अपघात ज्या कारणांमुळे होतो त्यातील प्रमुख कारण म्हणजे महामार्गाची झालेली दयनीय अवस्था. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, साईडपट्ट्यांही नाहीत, या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून खड्डे बुजविले तरच अपघात टाळता येतील. 
महामार्गावरील खड्ड्यांबाबत "सकाळ'ने सर्वेक्षण केले असताना बारा किलोमीटरच्या अंतरात 43 जीवघेणे खड्डे आढळून आहेत, तर लहान खड्ड्यांची संख्याही मोठी आहे. हे खड्डे टाळण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागते, प्रसंगी अपघातही घडतात. हे खड्डे बुजविण्याकडे ना सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देतो, ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी. त्यामुळे वाहनधारकांना महामार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

खासदारांच्या आदेशालाही "खो' 
खासदार उन्मेष पाटील यांनी 11 मेस जिल्हा नियोजन भवनात झालेल्या बैठकीत महामार्गावरील खड्डे अन साईडपट्टया बुजविण्यासोबतच तरसोद ते फागणे दरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम आठ दिवसांत करण्याचे आदेश दिले होते. आज तब्बल तीन आठवडे झाले तरीही कामाला सुरवात झालेली नाही. अधिकारी, कंत्राटदार जर लोकप्रतिनिधींच्या आदेशानंतरही कामे सुरू करीत नसतील तर राज्यात व केंद्रात भाजपचे शासन असून काय फायदा ? असा संतप्त प्रश्‍न नागरिक करीत आहेत. 

पोलिसांसमोर रोज अपघात तरी.. 
आकाशवाणी चौकात सागर पार्कच्या बाजूकडील भागात शहर वाहतूक पोलिस ड्यूटीवर असतात. त्या लहान चौकीसमोरच दोन मोठे खड्डे आहेत. त्यात वाहन पुढे नेताना दुचाकी, कार अचानक चक्क खड्ड्यात अडकतात. शहर वाहतूक पोलिसांसमोर हा प्रकार दररोज घडतो. मात्र, असे असताना कुणीही सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्याविषयी सांगत नाही. त्या भागातील नगरसेवकही त्याकडे दुर्लक्ष करतात, हे विशेष होय. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon natinal haighway damage