आदिवासी क्रांतिदलातर्फे ‘मनपा’समोर सामूहिक मुंडन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

जळगाव - आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात वेळोवळी मागणी करूनही महापालिका कारवाई करत नसल्याने आज एकलव्य आदिवासी क्रांतिदलातर्फे सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्तांनी दिलेल्या आश्‍वासानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. 

जळगाव - आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात वेळोवळी मागणी करूनही महापालिका कारवाई करत नसल्याने आज एकलव्य आदिवासी क्रांतिदलातर्फे सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्तांनी दिलेल्या आश्‍वासानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. 

जळगाव महापालिका हद्दीत असलेल्या सर्व्हे क्र. १५३ मध्ये आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीची जागा आहे. या जागेवर काही धनदांडग्यांनी अतिक्रमण केल्याने अंत्यसंस्कार करताना अडचणी येतात. याबाबत समाजातर्फे महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर अतिक्रमणधारकांना २०१४ मध्ये ते काढण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या. मात्र, आजपर्यंत अतिक्रमण जैसे थे आहे. त्यावर महापालिकेही कारवाई केलेली नाही, असे एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे आयुक्तांना आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेसमोर आज सकाळी सातपासून सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. 

आठ फेब्रुवारीनंतर बैठकीचे आश्‍वासन
महापालिका प्रवेशद्वाराजवळ सामूहिक मुंडन आंदोलन करून महापालिकेच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविल्यानंतर एकलव्य आदिवासी क्रांतिदलाचे पदाधिकारी व आदिवासी भिल्ल समाजबांधवांनी उपायुक्त चंद्रकांत खोसे यांना मागणीचे निवेदन दिले. त्यांनी आठ फेब्रुवारीस या विषयासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

अतिक्रमण निर्मूलन अधीक्षकांनी जागेची पाहणी
आदिवासी समाजाच्या दफनभूमीच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाची पाहणी आज अतिक्रमण निर्मूलन विभाग अधीक्षक एच. एम. खान यांनी केली. तसेच उद्या (ता. ३०) नगरचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली जाणार आहे, तर अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त लागणार असून, एक फेब्रुवारीला बंदोबस्त मिळण्यासाठीचे पत्र पोलिस प्रशासनाला अतिक्रमण विभागातर्फे देण्यात आले आहे.

Web Title: marathi news jalgaon news aadivasi krantidal mundal agitation