"सीसीटीव्ही' चोरट्यास एक वर्षाचा सश्रम कारावास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

जळगाव - शहरातील बालाजी पेठ भागात असलेल्या रिधुरवाडा चौकातील रहिवासी माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संशयितावर न्यायालयात दोषारोप सिद्ध होऊन न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

रिधुरवाडा येथे माजी नगरसेवक कैलास सोनवणे वास्तव्यास आहेत. त्यांच्या निवासस्थानीवर लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्याने चोरून नेल्याची घटना एप्रिल 2014 ला घडली होती. दाखल गुन्ह्यात तपास करताना पोलिस उपनिरीक्षक खेमराज परदेशी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शहरातील मन्यावाडा येथील शेख शहीद शेख अब्दुल (वय 26) याला अटक केली होती. अटकेनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. दरम्यान, त्याच्याकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह 5 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले होते. याबाबत दोषारोपपत्र सादर होऊन खटल्याचे कामकाज न्या. एन. के. पाटील यांच्या न्यायालयात सुरू असताना न्यायालयाने फिर्यादी व तपासधिकारी उपनिरीक्षक परदेशी यांच्या साक्ष, प्राप्त पुरावे आणि दस्तऐवजांच्या आधारे गुन्हा सिद्ध होऊन आरोपी शेख शहीद शेख अब्दुल याला दोषी ठरविले. त्यास चोरीच्या गुन्ह्यात एका वर्षाचा सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास पाच दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले. 

Web Title: marathi news jalgaon news cctv camera crime