"त्या' गर्भपातप्रकरणी चौकशीअंती कारवाई! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

जळगाव - जिल्हा रुग्णालयात एका महिलेचा गर्भपात निलंबित असलेल्या डॉ. वर्षा लहाळे यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत हे प्रकरण असून, यासंबंधी चौकशी अद्याप सुरू आहे. चौकशी पूर्ण करून अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर डॉ. लहाळे यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले. 

जळगाव - जिल्हा रुग्णालयात एका महिलेचा गर्भपात निलंबित असलेल्या डॉ. वर्षा लहाळे यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत हे प्रकरण असून, यासंबंधी चौकशी अद्याप सुरू आहे. चौकशी पूर्ण करून अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर डॉ. लहाळे यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले. 

जळगाव शहरातील गर्भवती महिला जिल्हा रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी दाखल झाली. या महिलेला एक मुलगा आणि तीन मुली असल्याने गर्भपातासाठी त्या रुग्णालयात आल्या होत्या. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांची तपासणी करून त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. परंतु, ही महिला खासगी रुग्णालयात जाऊन पाच- सहा दिवसांनी पुन्हा रुग्णालयात येऊन डॉ. वर्षा लहाळे यांना भेटली. दरम्यान, डॉ. लहाळे यांनी 10 मार्चला महिलेचा गर्भपात केला. विशेष म्हणजे ही महिला पहिल्या तपासणीच्या कागदपत्रांवर दुसऱ्यांदा तपासणीसाठी आली होती. मुळात दुसऱ्यावेळी नवीन कागदपत्रे तयार करणे अपेक्षित असताना डॉ. लहाळे यांनी अगोदरच्या कागदावर फेरफार करून निर्णय घेत गर्भपात केला. गर्भवती महिलेचा गर्भपात बेकायदेशीर नसला, तरी नाशिक येथील रुग्णालयातील गर्भपात प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेल्या डॉ. लहाळे यांनी पुन्हा अधिकार नसताना तेच काम करणे बेकायदेशीर ठरत आहे. 

दोन स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सह्या आवश्‍यक 
गर्भपाताच्या अशा प्रकरणात जिल्हा रूग्णालयात गर्भपात करतेवेळी दोन स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सह्यांची आवश्‍यकता असते. याशिवाय, जिल्हा शल्य चिकित्सक यांची परवानगी देखील तितकीच महत्त्वाची ठरते. पण, डॉ. लहाळे यांनी गर्भपात करतेप्रसंगी डॉ. भंगाळे व डॉ. संदीप पाटील यांच्या सह्या मागितल्या असता, दोघांनीही त्यास नकार दिल्याचे समजते. यातील नेमके सत्य चौकशीअंती बाहेर येणार असून, यासंबंधीचा चौकशी अहवाल आरोग्य उपसंचालक यांच्याकडे उद्या (ता.21) सादर करण्यात येणार आहे. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्याची तोंडी परवानगी? 
गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला पहिल्यावेळी परत पाठविण्यात आले असताना, दुसऱ्यांदा रुग्णालयात येऊन डॉ. लहाळे यांच्याकडून गर्भपात करून घेतला. या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा असून, डॉ. लहाळे यांनी गर्भपात करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची तोंडी परवानगी घेतली असता, त्यास मान्यता देण्यात आल्याचे समजते.

Web Title: marathi news jalgaon news hospital